काँग्रेसमध्ये नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न सहसा सहन केला जात नाही. पण नारायण राणे हे याबाबत एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा यात यशस्वी ठरले आहेत. राणे यांच्यासाठी काँग्रेसची एवढी अपरिहार्यता निर्माण का झाली, असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो. राणे यांना फार काही महत्त्व देऊ नये, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीदरबारी मांडले होते. पण राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला थोपवून पक्षाने मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा दिला आहे. 
नेतृत्व बदलाची मागणी अमान्य करीत नेतृत्वाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आगामी निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याने त्यांना मुक्त वाव मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर तोफ डागीत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच पक्ष प्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्रीपद देण्याचा दिलेला शब्द पाळण्यात आला नाही, असे सांगत दिल्लीतील नेतृत्वाला लक्ष्य केले होते. राणे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असून त्यांना फार काही महत्त्व देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्लीदरबारी मांडली होती. राणे यांची पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घडवून आणण्यात पुढाकार घेणेही मुख्यमंत्र्यांनी टाळले होते. दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात शेजारी बसूनही मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्याशी बोलण्याचे टाळले होते.
लोकसभेतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राणे यांच्यासारखा आक्रमक नेता गमाविणे पक्षासाठी हितकारक नाही, असा दिल्लीत एक मतप्रवाह होता. त्यातूनच राणे यांना राहुल गांधी यांची भेट मिळाली. सोनियांची भेट मिळत नसल्याने राणे अस्वस्थ होते. मंगळवारची मुदत दिल्याने गेल्या दोन दिवसांपासून पक्षाची सूत्रे हलू लागली. राहुल गांधी यांच्या इशाऱ्याशिवाय पक्षाच्या पातळीवर राणे यांच्याशी चर्चा होणे शक्यच नाही, असे सांगण्यात येते.
राणे यांना वेगळा न्याय ?
नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भजनलाल आणि जगनमोहन रेड्डी यांना पक्षाने त्यांची जागा दाखवून दिली. पण राणे यांना रोखून पक्षाने वेगळा संदेश दिला आहे. गेली नऊ वर्षे काँग्रेसने राणे यांना पक्षात महत्त्व दिले नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण केली नाही. काँग्रेस संस्कृतीत ते पूर्णपणे रमले नाहीत. जेव्हा पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गोंजारले. राज्य काँग्रेसमध्ये प्रभावी नेत्यांचा अभाव असल्यानेच नेतृत्व राणेंबाबत मवाळ भूमिका घेत असावी, अशी शक्यता आहे.
राणे यांना नक्की काय मिळणार ?
राजीनामा मागे घेताना तीन महिन्यांसाठी प्रदेशाध्यपद मिळावे, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली असली तरी प्रचार समितीच्या अध्यक्ष पदाशिवाय राणे यांच्या पदरी फार काही पडण्याची शक्यता फारच कमी आहे. राणे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि आमदार कृपाशंकर सिंग यांनी दिल्लीश्वरांच्या वतीने मध्यस्थी केली. या साऱ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोठेच नव्हते. त्यांना साऱ्या घडामोडींची माहिती दिली जात होती. पक्षाने त्यांच्याकडे प्रचार समितीचे अध्यक्षपद सोपविण्याची तयारी यापूर्वी दर्शविली होती. पक्षाच्या विजयासाठी आपण उद्यापासून उतरणार आहोत हे राणे यांचे विधान सूचक आहे. प्रचार समितीचे अध्यक्षपद घेऊन काही तरी हाती लागले हे दाखविण्याचा राणे प्रयत्न करतील. माघार घेतल्याने राणे आधीच टीकेचे धनी झाले आहेत. अशा वेळी फक्त मंत्रिपदी राहणे सोयीचे ठरणार नाही. मंत्रिपदाबरोबरच आणखी पद घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
सामुदायिक नेतृत्वाची हमी मिळाल्याचा दावा
मुंबई : आगामी निवडणूक ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असली तरी निवडणुकीत सामुदायिक नेतृत्व असेल, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केला. राणे यांची समजूत घालण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व  कृपाशंकर सिंग त्यांच्या निवासस्थानी आले होते.
दुसरी माघार
अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली तेव्हा डिसेंबर २००८ मध्ये राणे यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविले होते. त्यावरून राणे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पुढे राणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर पक्षाने त्यांचे निलंबन मागे घेतले होते. आता दुसरे बंड करण्याचा राणे यांचा प्रयत्नही फसला आहे.
राणे उवाच..
* पदांचा मला मोह नाही, पदेच माझ्या मागे येतात.
* मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत आता बदल होईल
* सन्मान राखण्याचे आश्वासन दिल्यानेच काँग्रेसमध्ये कायम
* पक्षाच्या विजयासाठी झटणार  
