सोनिया गांधी यांचे आंधळे पुत्रप्रेमच आपल्या देशासाठी फार महाग ठरले आहे. त्यांच्या या ‘रिमोट कंट्रोलमुळे’ यूपीए सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाताहत झाली, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. केवळ आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी सोनियांनी एव्हढा सगळा खटाटोप केला, पण त्यामुळे हाती काय लागले? ज्याच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत अशा व्यक्तीवर देशाने भरवसा कशाला ठेवावा, अशी पृच्छा त्यांनी केली.
पंतप्रधानांचे माजी प्रसारमाध्यम सल्लागार संजय बारू यांनी पंतप्रधानांवर आपल्या पुस्तकामधून केलेल्या वक्त्व्यांचा दाखला घेत मोदींनी पंतप्रधानांवरही शरसंधान केले. देशाच्या १२५ कोटी जनतेचे ‘अपघाती पंतप्रधान’ कधी तरी संपतील, मात्र त्यांच्यानंतर या देशाच्या भविष्याचे काय, देशाच्या तरुण पिढीने कोणाकडे पाहायचे याचा  गांभीर्याने विचार करावयास हवा, असे आवाहन त्यांनी केले.
ज्यांचे शिक्षण परदेशात झाले असे एक मंत्री देशातील जनतेला ‘अस्वच्छ आणि आळशी’ म्हणतात. तर, देशाचे अर्थमंत्री ज्या देशातून ‘सोन्याचा धूर निघत असे’, अशा देशास ५००० वर्षांपूर्वीपासूनचा दरिद्री देश म्हणतात, हाच यांचा देशाभिमान असा टोला त्यांनी जयराम रमेश आणि चिदम्बरम् यांना हाणला.