मतदारांना गृहीत धरणाऱ्या छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव गावित, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नीलेश राणे या मतदारांना गृहीत धरणाऱ्या मातब्बर नेत्यांच्या गुर्मीस या निवडणुकीत चपराक बसली.
मतदारांना व मित्रपक्षालाही गृहीत धरण्याची गुर्मी..ठराविक मंडळींची दादागिरी..विरोधकांकडून सातत्याने होत असलेले भ्रष्टाचाराचे आणि गुंडगिरीला प्रोत्साहनाचे आरोप..गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यात झालेला उशीर..कमकुवत झालेली मनसे..सत्ताधाऱ्यांविरोधातील नकारात्मक सूर आणि मोदी लाट..या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा झालेला पराभव.
नाशिकमध्ये केवळ आपणच विकास कामे  केल्याच्या आविर्भावात भुजबळ काका-पुतणे वावरत होते. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली वागणूक, काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबरोबरचे वितुष्ट यामुळे काँग्रेसची मंडळी भुजबळांपासून दूर गेली. मोदी लाटेचा पुरेपूर फायदा घेत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी भुजबळांचा दणदणीत पराभव घडवून आणला.
शिंदेंचा दारुण पराभव
काँग्रेसचे दिग्गज नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दारूण पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मोदी लाटेच्या प्रभाव आणि काँग्रेस व राष्ट्रवादीअंतर्गत वाटमारीच्या राजकारणाचा फटका शिंदे यांना बसल्याचे मानले जाते. सुशीलकुमार शिंदे या सुरक्षित मतदारसंघातून चौथ्यांदा उभे होते. त्यांच्या विरोधात उभे करायला भाजपकडे सुरुवातीला उमेदवार नव्हता. भाजपने अ‍ॅड. शरद बनसोडे यांना बळजबरीनेच मैदानात आणले. विकासाचा मुद्दा बाजूला पडून ही निवडणूक सुशीलकुमार शिंदे विरूध्द शरद बनसोडे अशी न होता शिंदे विरूध्द मोदी अशीच झाली. यात बनसोडे यांचा तब्बल एक लाख ५२ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.
गावितांना मोदी लाटेचा तडाखा
स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नंदुरबार या आदिवासीबहुल मतदार संघावर नरेंद्र मोदींच्या लाटेची मोहिनी पडली आणि तब्बल नऊ वेळा या संघातून निवडून जाणाऱ्या माणिकराव गावितांना पराभवाची धूळ चाखावी लागली. काँग्रेसचा देशातील प्रचाराचा प्रारंभ नंदुरबारमधून होत असे. यंदा ऐनवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नियोजित सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे पक्षाच्या पारंपरिक आदिवासी मतदारांचा हिरमोड झाला. मोदींनी सभा घेऊन या मतदारांना आकर्षित केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका माणिकरावांना बसला. केंद्रीय मंत्रिपद मिळूनही माणिकराव विकास कामे करू शकले नाहीत. यामुळे असलेली नाराजी माणिकरावांना भोवली.      
पद्मसिंहांची सद्दी संपली!
सात वेळा आमदार आणि एकदा खासदार, मधली अनेक वर्षे राज्य सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्रिपद अशी चढत्या कमाने कारकीर्द लाभलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांना पराभव कधी ठाऊक नव्हता. या वेळी पहिल्यांदा, तेही तब्बल २ लाख ३३ हजार मतांनी त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.
पटेलांना अतिआत्मविश्वास नडला
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते प्रफुल्ल पटेलांना अतिआत्मविश्वास नडला. यूपीएच्या गेल्या दोन कारकिर्दीत केंद्रात महत्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपद उपभोगूनही मतदारसंघातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका जनतेने त्यांना दिला आहे.
आबांना धुडकावले
घराणेशाही, एकवटलेले विरोधक, राष्ट्रवादीची छुपी ताकद आणि मोदींच्या सभेनंतर मतदारसंघात तयार झालेली मोठी लाट या साऱ्यांचा परिणामी सांगलीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला आणि भाजपच्या संजयकाका पाटील यांनी काँग्रेसची गेल्या तीन पिढय़ांची घराणेशाही मोडीत काढत प्रतीक पाटील यांना पराभूत केले.