30 October 2020

News Flash

उसाइतके उत्पन्न देणारे ज्वारीचे नवे वाण

हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाचा पर्याय शेतकरी निवडतात.

|| प्रदीप नणंदकर

कायम दुष्काळग्रस्त असा शिक्का असलेल्या मराठवाडय़ाला वाढत्या ऊस लागवडीचा धोका अनेक अभ्यासक नेहमी व्यक्त करतात. प्यायला पाणी नाही, पण या भूगर्भातील पाणी ओरबाडणाऱ्या उसाच्या शेतीत मात्र दिवसेंदिवस वाढ होत आहे. या उसालाच पर्याय देणारे, त्याच्या एवढेच उत्पन्न देणारे आणि मुख्य म्हणजे उसापेक्षा खूप कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारीच्या एका नव्या वाणाची निर्मिती नुकतीच करण्यात आली आहे. या ज्वारीची प्रायोगिक तत्त्वावर लातूर जिल्हय़ातील औसा तालुक्यात लागवड करण्यात आली आहे.

हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाचा पर्याय शेतकरी निवडतात. ज्या भागात पाणी उपलब्ध नाही त्या भागातील शेतकरीही उसाच्या पिकाचे स्वप्न उराशी बाळगतात, कारण अन्य पिकांच्या तुलनेत उसाचे उत्पन्न अधिक होते, शिवाय इतर पिकाच्या तुलनेत या पिकासाठी परिश्रमही कमी घ्यावे लागतात. मराठवाडय़ात दुष्काळग्रस्त भागातही उसाची शेती वाढते आहे, त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे. या भागातील शेतकऱ्याला केवळ कमी पाण्यावर येणारी पिके घ्या असा सल्ला देऊन चालणार नाही तर अशी कोणती पिके आहेत जी कमी पाण्यावर येतात व त्यांचे उत्पन्न उसाइतके मिळते हे शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. इतके दिवस असा पर्याय समोर नव्हता, त्यामुळे शेतकऱ्याला समजवायचे कसे? या प्रश्नाला उत्तर मिळत नव्हते. आता या नव्या ज्वारीच्या वाणाने हा प्रश्न सोडवला आहे.

बेंगलोर येथील ‘इक्रीसॅट’ व ‘नागार्जुना फर्टिलायझर्स’ यांनी गोड ज्वारीचे नवीन वाण उपलब्ध केले आहे. उसापेक्षा केवळ २० टक्के पाणी या पिकाला लागते. चार महिन्यांत हे पीक हाती येते. वर्षांतून तीन वेळा हे पीक घेता येते. या ज्वारीमध्ये ‘सुक्रोट’चे प्रमाण ८० ते ८५ टक्के असल्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी ही ज्वारी अतिशय उपयुक्त आहे. प्रतिहेक्टरी ८० टन उत्पादन या ज्वारीतून मिळते. या ज्वारीची लागवड यांत्रिक पद्धतीने केल्यास उत्पादनाचा खर्च आणखी कमी होतो. शिवाय या ज्वारीचा चारा जनावरांना खाऊ घातल्यास दुधाच्या उत्पादनात ३० टक्के वाढ होते असे मत हैदराबाद येथील संशोधक पी. किरणकुमार यांनी व्यक्त केले आहे.

लातूर जिल्हय़ातील औसा तालुक्यातील लोदगा या गावी प्रायोगिक तत्त्वावर या ज्वारीच्या वाणाचा पेरा सध्या केला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच या वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आपल्या शेतीत हे वाण पेरले आहे. लातूर परिसरात उसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. दोन वर्षांपूर्वी लातूर शहराला पिण्यासाठी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. याच लातूरमध्ये यंदा उसाच्या लागवडीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. ५ हजार हेक्टरवरील क्षेत्र पुन्हा ५० हजार हेक्टरवर पोहोचले आहे. भूगर्भातील उपलब्ध पाण्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

हे पाणी वाचवायचे असेल तर या शेतक ऱ्यांना उसापासून परावृत्त केले पाहिजे. असे परावृत्त करायचे असेल तर तेवढय़ा उत्पन्नाची हमी देणारे आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकाचा पर्याय दिला पाहिजे. या दृष्टीने ज्वारीचे हे नवे वाण अधिक फलदायी ठरणार आहे. या नव्या ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा पेरा वाढवणे मराठवाडय़ाच्या हिताचे राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2018 1:31 am

Web Title: sorghum in maharashtra
Next Stories
1 मोत्यांची शेती!
2 रोपवाटिकेला आधुनिकतेचा आयाम
3 ‘सरस्वती’ची कीर्ती
Just Now!
X