जळगाव, धुळे भागांत पांढऱ्या कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणात होते. तर नागपूर, वर्धा, अकोला येथील बाजारात पांढरा कांदा विकला जातो. देवगडच्या हापूसची जशी ओळख आहे, तशीच आता अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची ओळख तयार झाली आहे. मुंबईत हिरव्या पातीसह पांढरा कांदा जुडय़ा बांधून विकला जातो. त्याची चवही न्यारीच आहे. त्यामुळे त्याला सतत मागणी असते भावही चांगला मिळतो. सध्या तरी अर्थकारणात पांढरा कांदा हा सरस ठरतो आहे. कृषी अनुसंधान परिषदेच्या राजगुरुनगर येथील कांदा, लसूण संशोधन संस्थेने या कांद्यातील औषधी गुणधर्म तपासण्याकरिता देशातील काही संस्थांकडे संपर्क करून औषधी गुणधर्माची माहिती मागविली आहे. निष्कर्ष काहीही निघो पण आता पांढरा कांदा हा लोकांच्या पसंतीला उतरू लागला आहे

पूर्वी दिसण्यापेक्षा गुणाला महत्त्व होते. पण आता दिसण्याला अधिक चांगले दिवस आले आहे. त्याला शेतमालही अपवाद नाही. अगदी कांद्याचेच उदाहरण घेतले तर लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. बाजारात त्याला चांगला दर मिळतो. त्यामुळे कृषी संशोधक हे लाल रंगाच्या कांद्याच्या जाती संशोधनाकडेच अधिक लक्ष देतात. पण आता पांढऱ्या कांद्यात औषधी गुणधर्म असल्याने ग्राहकांचा ओढा त्याकडे वाढला आहे. निर्जलीकरण, पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी वापर केला जात असल्याने पांढऱ्या कांद्याची प्रतिष्ठा वाढली आहे.

जगभर आहारात कांद्याचा वापर असतो. देशात तर कांदा सर्वाधिक उपयुक्त आहे. धार्मिक कारणामुळे काही लोक कांदा खात नाहीत. आयुर्वेदात कांदा हा गुणकारी मानला गेला आहे. ऊन लागल्यावर त्याचा रस अंगाला लावला जातो. नपुंसकत्व घालविणे, शरीरात ऊर्जा वाढविणे, झोप लागणे तसेच क्षयरोग, हृदयरोग, मूळव्याध आदींवर कांदा गुणकारी मानला आहे. कांद्यात ग्लुटामिन, अर्जीनाइन, सिस्टम, सेपोनिन ही रसायने असतात. अ, ब व क जीवनसत्त्व त्यात असते. खनिजेही त्यात असतात. त्यामुळे त्याला आहारात महत्त्व आहे. मात्र अ‍ॅलोपॅथी व होमिओपॅथीचे काही डॉक्टर कांदा खाऊ नका, असा सल्ला देतात. पण तरीदेखील कांद्याचे महत्त्व काही कमी झालेले नाही. आता पांढऱ्या कांद्यात औषधी गुणधर्म असल्याचा लोकांचा समज अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे खरेच त्यात औषधी गुणधर्म आहेत का या दृष्टीने आतापर्यंत कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी विचार केलेला नव्हता. पण तसा विचार करण्याची वेळ आली आहे. कृषी अनुसंधान परिषदेच्या राजगुरुनगर येथील कांदा, लसूण संशोधन संस्थेने त्याकरिता देशातील काही संस्थांकडे संपर्क करून औषधी गुणधर्माची माहिती मागविली आहे. निष्कर्ष काहीही निघो पण आता पांढरा कांदा हा लोकांच्या पसंतीला उतरू लागला आहे.

देशात पांढरा, लाल, पिवळा असे तीन प्रकारचे रंग काद्याचे आहेत. जगभर कांदापीक घेतले जाते. विशेष म्हणजे लाल रंगाचा पुणा फुरसंगी हा वाण जगात लोकप्रिय आहे. पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका तसेच सुमारे ३५ देशांत हा वाण लोकप्रिय आहे. पण आता त्याचे वैशिष्टय़े हे वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळे आहे. त्याच्यातून अनेक जाती निर्माण झाल्या. १७०० ते १८०० जाती देशात आहेत. राज्यात ४०० ते ५०० जाती आहेत. कांद्यात असलेल्या एन्ट्रोसायजिंग या रंगद्रव्यामुळे कांद्याचा रंग लाल होतो. पांढऱ्या कांद्यात हे रंगद्रव्य नसते. चवीला तो कमी तिखट असतो.

युरोपमध्ये पिवळा व पांढरा कांदा वापरला जातो. मात्र अन्यत्र लाल कांद्याचीच चलती आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये लाल कांदा वापरला की, रंग बदलतो. पण पांढरा कांदा वापरला की, रंग तोच राहतो. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगात पांढऱ्या कांद्याला अधिक मागणी आहे. आता बाजारात रेडी टु इट प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यात पांढरा कांदाच वापरला जातो. पांढऱ्या कांद्याचे काप मोठय़ा हॉटेलमध्ये मिळतात.

कांद्याचा वापर केला तर पूर्वी मसाला जास्त दिवस टिकत नव्हता. त्यामुळे त्यात कांदा वापरला जात नव्हता. पण आता पांढऱ्या कांद्याची पावडर त्यात मसाला उत्पादक वापरू लागले आहेत. परदेशात तर सर्रास पांढऱ्या कांद्याची पावडर वापरली जाते. स्वयंपाकघरात कांदा भाजून किंवा तळून तो भाज्यांमध्ये वापरला जातो. त्याकरिता वेळ जातो. पण आता कांदा पावडरही हॉटेलचालक वापरू लागले आहे.

कांदा, लसूण पेस्ट बाजारात मिळू लागल्याने तिचा वापरही सुरू झाला आहे. असे असले तरी अजूनही कांदा वापरण्याचे प्रमाणच देशात अधिक आहे. मात्र भविष्यात ते प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने पांढऱ्या कांद्याला दिवस चांगले येतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

गुजरातमध्ये महुआ व भावनगर भागात कांद्याची पावडर तयार करणारे सुमारे ८० कारखाने तर अन्य राज्यांत २० कारखाने आहेत. जैन उद्योग समूहाचा गुजरातमध्ये एक तर राज्यात जळगाव येथे एक असे दोन कांदा प्रक्रिया प्रकल्प आहेत. कांद्याचे निर्जलीकरण करून ६५ हजार टन कांदा पावडर परदेशात पाठविली जाते. सुमारे एक लाख टन कांद्यावर प्रक्रिया केली जाते. पांढऱ्या कांद्यात घनपदार्थ जास्त असल्याने त्याची पावडर लाल कांद्याच्या तुलनेत जास्त तयार होते. तिचा दर्जाही चांगला असतो.

जळगाव, धुळे भागांत या कांद्याची लागवड होते. तर नागपूर, वर्धा, अकोला येथील बाजारात पांढरा कांदा विकला जातो. देवगडच्या हापूसची जशी ओळख आहे, तशीच आता अलीबागच्या पांढऱ्या कांद्याची ओळख तयार झाली आहे.

मुंबईत हिरव्या पातीसह पांढरा कांदा जुडय़ा बांधून विकला जातो. त्याची चवही न्यारीच अशी आहे. त्यामुळे त्याला सतत मागणी असते व भावही चांगला मिळतो. सध्या तरी अर्थकारणात पांढरा कांदा हा सरस ठरतो आहे.

मातीशी कांद्याचं आगळंवेगळं नातं

पांढऱ्या कांद्याच्या भीमाश्वेता, भीमाव्हाइट, भीमाशुभ्रा या जाती राजगुरुनगर येथील कांदा संशोधन केंद्राने संशोधित केल्या. त्यानंतर नाशिक येथील भाजीपाला संशोधन व विकास संस्थेने अ‍ॅग्रीफाऊंड व्हाइट तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अकोला सफेद ही जात शोधली. सर्वत्र याच जातीची लागवड होती.  अलिबाग भागात लावला जाणारा कांदा हा याच प्रकारचा आहे. पण तेथील मातीचा वेगळा गुणधर्म आहे. त्यामुळे त्याला वेगळीच चव येते. माती चिवट असल्याने तो गोल होण्याऐवजी निमुळता राहतो. साहजिकच जमिनीच्या वैशिष्टय़ाने तो भाव खाऊन गेला आहे.

औषधी गुणधर्माची तपासणी

पांढऱ्या कांद्यातील औषधी गुणधर्माची तपासणी करण्यासाठी हा कांदा देशातील काही संशोधन संस्थांकडे पाठविला असल्याचे राजगुरुनगर येथील कांदा, लसूण संशोधन संस्थेचे प्रभारी संचालक विजय महाजन यांनी सांगितले. तर अमेरिका व युरोपमध्ये पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला संधी असल्याचे नाशिकच्या भाजीपाला संशोधन व विकास संस्थेचे उपसंचालक एच. पी. शर्मा यांनी स्पष्ट केले. मात्र आता काही देशांनी आयात कमी करून स्वतच पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले असून प्रक्रियाही सुरू केली आहे. तयार खाद्यपदार्थाकडे त्यांचा ओढा कमी होत असल्याने कांदा पावडरला पूर्वीसारखी मागणी नसल्याचे कांदा प्रक्रिया उद्योगातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ashoktupe@expressindia.com