१९९२च्या मध्यापर्यंत युरोप-अमेरिकेमधल्या विविध संगणक तंत्रज्ञ व विद्यार्थ्यांचा लिनक्समधला सहभाग एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वाढला होता की, अक्षरश: दर २ ते ४ दिवसांनी लिनक्सची एक नवी आवृत्ती टॉरवल्ड्सला प्रकाशित करावी लागत होती. त्या वेळेला टॉरवल्ड्स स्वत:च्या हेलसिंकी विद्यापीठाच्या फाइल सव्र्हरव्यतिरिक्त लिनक्सच्या नव्या आवृत्तीचा सोर्स कोड एकाच वेळेला जर्मनी व अमेरिकेतल्या एमआयटी विद्यापीठांतील सव्र्हरवर अपलोड करत असे. (संगणकीय भाषेत याला roring असे म्हणतात.) १९९२ मध्ये इंटरनेट बाल्यावस्थेत होते व काही बडी विद्यापीठे किंवा कंपन्या वगळता सर्वत्र उपलब्ध नव्हते.
त्यामुळे या सव्र्हरवर लिनक्स उपलब्ध असूनही इंटरनेटच्या मर्यादेमुळे अनेक तंत्रज्ञ व विद्यार्थ्यांना लिनक्सची नवी आवृत्ती मिळवण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागत असे. अशा वेळेला बरेच जण लिनक्सची देवाणघेवाण फ्लॉपी डिस्कवर करत असत. फ्लॉपी डिस्कच्या एकदशांश आकार असूनही शेकडो गिगाबाइट साठवण्याची क्षमता असणाऱ्या आजच्या पेन ड्राइव्हच्या जमान्यात जेमतेम एक ते दीड मेगाबाइट साठवू शकणारी फ्लॉपी डिस्क हास्यास्पद वाटेल; पण वेळकाढू व खर्चीक असली तरी त्या काळात माहितीची आदानप्रदान करण्याची ती एक सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत होती.
टॉरवल्ड्सने लिनक्ससाठी वापरलेली लायसन्सिंग पद्धती (जी त्याने स्वत:च निर्मिली होती.) ओपन सोर्सचा पुरस्कार करणारी असली तरीही त्यात एक मेख होती. त्यात टॉरवल्ड्सने लिनक्स सोर्स कोडच्या वितरणातून कसल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यापासून मज्जाव केला होता. यामुळे लिनक्सच्या वापरकर्त्यांची चांगलीच पंचाईत व्हायची. कारण लिनक्सच्या सोर्स कोडचे फ्लॉपी डिस्कवर वितरण करणाऱ्या तंत्रज्ञाला फ्लॉपी डिस्कचा व लिनक्स प्रणाली त्यावर चढवण्याचा खर्च स्वत:लाच उचलावा लागे.
हळूहळू विविध चर्चामंचांवर लिनक्सच्या लायसन्सिंग पद्धतीतली ही जाचक अट काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. लिनक्सच्या वापरकर्त्यांची मागणी रास्त होती. त्यांचा हेतू हा लिनक्स वितरणातून पैसे कमावण्याचा मुळीच नव्हता. याउलट यामुळे लिनक्सच्या प्रसाराला हातभार लागण्याचीच अधिक शक्यता होती. टॉरवल्ड्सला लोकांचे म्हणणे पटत होते व व्यवहार्यदेखील वाटत होते. अखेरीस १९९२ मध्ये त्याने ही जाचक अट बदलायच्या ऐवजी लिनक्सची लायसन्सिंग पद्धतीच बदलून टाकली व लिनक्ससाठी रिचर्ड स्टॉलमनने निर्मिलेल्या जीपीएल (जनरल पब्लिक लायसन्स) लायसन्स पद्धतीचा अंगीकार केला.
खरोखरच हा एक मास्टरस्ट्रोक होता, ज्याने अनेक हेतू साध्य झाले. एक म्हणजे तोपर्यंत जीपीएल लायसन्स पद्धती ही ओपन व्यवस्थेत चांगलीच प्रस्थापित झाली होती व त्यात सोर्स कोड वितरित करण्याचे बंधन असले तरीही वितरणासाठी शुल्क लावण्याकरिता कसलीही आडकाठी नव्हती. दुसरे या निर्णयामुळे रिचर्ड स्टॉलमनचा व त्याच्या फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनचा लिनक्स प्रकल्पाला पाठिंबा मिळाला असता.
टॉरवल्ड्स हे जाणून होता की, स्टॉलमनने सोडलेला नव्या ऑपरेटिंग प्रणालीचा संकल्प अपूर्णावस्थेत होता व लिनक्सची होणारी घोडदौड बघता स्टॉलमनकडून या प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. स्टॉलमनचे या क्षेत्रातले वजन पाहता टॉरवल्ड्सला त्याच्याबरोबर सहयोगाची भूमिका घेणे जास्त सयुक्तिक वाटले.
आणि तिसरे म्हणजे यामुळे टॉरवल्ड्सला लिनक्समध्ये फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनने निर्मिलेल्या जीएनयू प्रकल्पातल्या काही उपयुक्त सॉफ्टवेअर प्रणालींचा अधिकृतपणे अंतर्भाव करण्याचा मार्ग मोकळा झाला. लिनक्सच्या सुरुवातीच्या वाढीस या प्रणालींचा चांगलाच हातभार लागला. उदाहरणार्थ, लिनक्समधल्या ‘शेल’ या भागाच्या निर्मितीकरिता सुरुवातीला टॉरवल्ड्सने जीएनयू प्रकल्पातल्या बॅश (BASH) या सॉफ्टवेअरचा उपयोग केला.
१९९३ नंतर टॉरवल्ड्सला हे जाणवायला लागले होते की, पुढील काळात दूरसंचार क्षेत्रातल्या क्रांतीमुळे इंटरनेटची उपलब्धता उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. अशा वेळेला लिनक्सला इंटरनेट युगासाठी तयार करणे गरजेचे आहे. थोडक्यात, लिनक्सच्या आरेखनामध्ये इंटरनेटसाठी सर्वाधिक वापरात असलेल्या टीसीपी/आयपी (TCP/IP – Transmission Control Protocol / Internet Protocol: इंटरनेटवर संभाषण करू इच्छिणाऱ्या दोन प्रणाली अथवा उपकरणांमधल्या संवादामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी केलेले तपशीलवार तांत्रिक नियम) नेटवर्कच्या कार्यक्षमतेचा लिनक्समध्ये अंतर्भाव करणे जरुरी होते.
हे अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचे काम होते. ओपन सोर्स ऑपरेटिंग प्रणालीमध्ये इंटरनेट-सुसंगत कार्यक्षमता देण्याचे काम प्राथमिक स्वरूपात केवळ बिल जॉयने बीएसडीमध्ये केले होते; पण ९० च्या दशकात बीएसडी ही एटीअँडटी व बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठामधल्या न्यायालयीन लढाईच्या कचाटय़ात सापडली होती. त्यामुळे बीएसडीचा सोर्स कोड वापरणे तितकेसे शहाणपणाचे ठरणार नव्हते. यामुळे मुळापासूनच यावर काम करणे जरुरी होते.
या कामासाठी सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेतला फ्रेड वॅन केम्पेन या संगणक अभियंत्याने! वॅन केम्पेनच्या कल्पना भव्यदिव्य होत्या. त्याला लिनक्सला टीसीपी/ आयपीबरोबरच इतर प्रकारच्या नेटवर्क्सवर चालविण्यासाठी सक्षम बनवायचे होते. त्या काळात लिनक्सच्या वाढीच्या वेगाने टोक गाठले असल्याने इतर सहयोगी तंत्रज्ञांना वॅन केम्पेनची ही सर्वोत्तमाचा ध्यास घेतलेली व संथगतीने पुढे सरकणारी पद्धत मानवत नव्हती.
कितीही निष्णात अभियंता असला तरीही वॅन केम्पेन काहीसा एककल्ली होता. जोपर्यंत त्याला त्याने स्वत: लिहिलेल्या सोर्स कोडवर १००% खात्री वाटत नसे तोवर तो सोर्स कोड सर्वासाठी खुला करतच नसे. त्यामुळे दिवसचे दिवस इतर तंत्रज्ञांना त्याच्या कामाचा कसलाच सुगावा लागत नसे. ओपन सोर्स व्यवस्थेत तुमचे सहयोगी विखुरलेले असल्याने सतत संवाद चालू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. वॅन केम्पेनचे वागणे या तत्त्वाच्या अगदी विरुद्ध होते. हळूहळू त्याच्या या तुघलकी कारभारामुळे लोकांचा संयम संपत चालला होता.
अखेरीस एका लिनक्स चर्चामंचावर वॅन केम्पेनविरुद्ध चर्चेला तोंड फुटले. लिनक्स हा कोणत्याही कंपनीचा प्रकल्प नसल्याने वॅन केम्पेनची पदावनती वा काढून टाकणे वगैरे ‘कॉर्पोरेट’ प्रकार शक्य नव्हते. लोकांचा रोष लक्षात घेऊन मग टॉरवल्ड्सने एक धाडसी पाऊल उचलले. त्याने जाहीरपणे अॅलन कॉक्स या ब्रिटिश संगणक तंत्रज्ञाला समांतरपणे लिनक्सला इंटरनेटवरील कार्यक्षमता बहाल करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यास सांगितले.
अॅलन कॉक्स हा कुशाग्र बुद्धीचा पण व्यवहारचातुर्य असलेला अभियंता होता. त्याने अल्पावधीतच वॅन केम्पेनचा सुरुवातीचा सोर्स कोड घेऊन लिनक्सला टीसीपी/ आयपी नेटवर्कसाठी कार्यसिद्ध केले. त्याची कार्यशैली ही सर्वोत्तम मिळवण्यासाठी शेवटपर्यंत थांबण्याऐवजी टप्प्याटप्प्याने सर्वोत्तमाचे ध्येय गाठण्याची होती, जी लिनक्स संस्कृतीशी सुसंगत होती.
कॉक्स विरुद्ध वॅन केम्पेन या दोन परस्परविरोधी दृष्टिकोनांमध्ये टॉरवल्ड्सने कॉक्सच्या बाजूने कौल दिला व त्याने लिहिलेला सोर्स कोड लिनक्सच्या नव्या अधिकृत आवृत्तीत समाविष्ट केला. त्या वेळी टॉरवल्ड्सने या निर्णयासाठी दिलेली कारणमीमांसा लिनक्सची व एकंदरीतच ओपन सोर्स प्रकल्पामधली निर्णय घेण्यामागची विचारधारा स्पष्ट करते. त्याने म्हटले होते – “Alan Cox’s code worked reliably and satisfied needs of 80% of the users.” ओपन व्यवस्थेत निर्णय हे (बऱ्याच प्रमाणात) व्यक्तिनिष्ठ नसतात. तांत्रिक गुणवत्तेबरोबरच कामाचा वेग, इतर सहयोगी तंत्रज्ञांचा पाठिंबा अशा वस्तुनिष्ठ निकषांवरच निर्णय घेतला जातो. यामुळेच झाल्या प्रकारामुळे वॅन केम्पेन व्यथित झाला असला तरी तो लिनक्सचा सोर्स कोड घेऊन स्वत:चा नवा प्रकल्प (फोर्क) करू धजावला नाही. कारण त्याच्या या प्रकल्पामध्ये त्याला तंत्रज्ञांचे कितपत सहकार्य मिळेल याची त्यालाच शाश्वती नव्हती.
अखेरीस मार्च १९९४ मध्ये टॉरवल्ड्सने लिनक्सची टीसीपी/ आयपी नेटवर्कवर चालू शकणारी अशी पहिली आवृत्ती प्रकाशित केली. यात पुष्कळ सुधारणा व नव्या कार्यक्षमतांचा लिनक्समध्ये अंतर्भाव करण्यात आला असला तरीही एक मोठी मर्यादा अजूनही बाकी होती. तोवर लिनक्स केवळ इंटेल मायक्रोप्रोसेसर चकती असणाऱ्या संगणकांवरच काम करू शकत होती. लिनक्सवाढीच्या पुढील टप्प्यात ही महत्त्वाची मर्यादा दूर करण्यात टॉरवल्ड्सला यश आले. आत्तापर्यंत परिघाबाहेर असलेली ओपन सोर्स व्यवस्था आता मुख्य धारेत प्रवेश करू पाहत होती व संगणक तसेच इतर क्षेत्रांतल्या दिग्गज कंपन्यांनी तिला गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली होती. या सर्वाचा ऊहापोह आपण पुढील लेखात करू.
– अमृतांशू नेरुरकर
amrutaunshu@gmail.com
(लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)