महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

राज्यातील मृत्यू दर ३.७ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्के इतके झाले आहे असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये १५२ करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये १०२ पुरुष तर ५० महिलांचा समावेश होता. १५२ मृ्त्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ८५ रुग्ण होते. ५४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. तर १३ रुग्ण हे ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. १५२ पैकी १०७ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता ३५९० झाली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी ३५ मृत्यू मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरीत मृत्यू हे १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतले आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या ६ लाख ९ हजार ३१७ रुग्णांच्या नमुन्यांपैकी ९७ हजार ६४८ जणांचे नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २८ हजार ६६ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे.