कळसुली – भोगनाथ येथील पूर्व प्राथमिक शाळेत इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकत असलेल्या सायली घाडीगावकर व दिवेश घाडीगावकर या चिमुरडय़ा विद्यार्थ्यांनी ‘हवेच्या दाबाचे’ तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना बहुपयोगी ठरणाऱ्या ‘सिंधुगन’ची निर्मिती केली आहे. पी.व्ही.सी. पाइपचा तुकडा, मोटार सायकलचा हवा भरण्याचा व्हॉल्व यांसारख्या वापरातल्या वस्तूंपासून निर्मित करण्यात आलेली ही गन सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असून, कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या या गन अर्थात बंदुकीच्या साहाय्याने येथील शेतकऱ्यांना रानटी प्राण्यांच्या, विशेषत हत्तींच्या, उपद्रवाला कोणत्याही प्रकारे इजा न करता अटकाव करता येणे सहज शक्य होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा अग्नीची निर्मिती करण्याकरिता लायटरप्रमाणे या गनचा वापर करता येणे शक्य आहे. याशिवाय िभतीना रंग देण्याकरिता स्प्रे पेंटिंगसाठीदेखील या गनचा वापर केला जाऊ शकतो. या गनचे इतरही अनेक उपयोग असून अशा या बहुगुणी गनने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये नुकताच पाचवा क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे केरळ येथे राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनासाठी या गनची निवड करण्यात आली आहे. कळसुली- भोगनाथसारख्या छोटय़ाशा गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना हत्तींचा उपद्रव आणि त्या अनुषंगाने होणारे शेतीचे नुकसान तसेच जीवित व आíथक हानीची टांगती तलवार ही दरसालाची डोकेदुखी ठरली आहे. हत्तींचा उभ्या पिकातील धुमाकूळ व मानवी वस्तींमध्ये होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी शासन पातळीवर हत्ती-पकड मोहीम राबविण्यात येते; परंतु ही मोहीम भरपूर मनुष्यबळाच्या वापरासह खर्चीक, दामविणारी तसेच श्रमिक असते. या सर्व गोष्टींचा विचार करून यावर कमी खर्चात प्रभावी उपाय शोधण्याच्या भूमिकेतून या शाळेचे विज्ञान शिक्षक नंदकुमार हरमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन विद्यार्थी संशोधनाला लागले आणि या प्रयत्नातून त्यांनी ही सिंधुगन विकसित केली.
हत्ती हा एक हुशार प्राणी आहे. जंगलातील किंवा रानातील ज्या भागात वाघाची विष्ठा असते त्या भागात हातींचा कळप फिरकत नाही. त्यामुळे या गनच्या माध्यमातून शेतात व मानवी वस्तीच्या आजूबाजूला वाघाच्या विष्ठेची फवारणी केली तर हत्तींच्या उपद्रवापासून बचाव होऊ शकतो, अशी माहिती देऊन शिक्षक नंदकुमार हरमळकर यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयातून वाघाची विष्ठा मिळवून हा प्रयोग केला असता तो यशस्वी झाला आहे. तसेच हत्तींशिवाय माकड, कोल्हे यांसारखे रानटी प्राणी व पक्षी हेदेखील शेतीचे नुकसान करतात. त्यांना हुसकाविण्यासाठी या गनचा उपयोग होतो. शेतीतील पिकांवर अनेक रोग होतात. अशा वेळी पिकांवर औषधांची फवारणी करण्यासाठी या गनचा स्प्रेप्रमाणे उपयोग करता येऊ शकतो. या बंदुकीसाठी गोळ्या म्हणून काचेच्या गोट्या, नदीमधील गुळगुळीत छोटे दगड यांचा वापर करता येतो. या वस्तू शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होऊ शकतात. या गनमधून सुटणारी गोळी ५० मीटपर्यंत लांब जाते. एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी ही सिंधुगन अत्यंत उपयोगी ठरणार आहे. त्यानुसार इच्छुक शेतकऱ्यांना घरच्या घरी ही सिंधुगन बनविण्याकरिता शाळेमार्फत निश्चितच मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती शिक्षक नंदकुमार हरमळकर यांनी दिली. सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सायली व दिवेश यांनी तयार केलेल्या तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या ‘सिंधुगन’च्या प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात आले होते. त्या वेळी या गनला तालुक्यात व जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक मिळाला होता. तर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात या सिंधुगनच्या प्रतिकृतीला पाचवा क्रमांक मिळाला होता. आणि आता राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात सिंधुगनची प्रतिकृती सादर करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. कळसुलीसारख्या ग्रामीण भागातील पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश नेत्रदीपकच म्हणावे लागेल. त्यामुळे या शाळेचे तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2015 रोजी प्रकाशित
कळसुलीची ‘सिंधुगन’ राष्ट्रीय पातळीवर
‘हवेच्या दाबाचे’ तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना बहुपयोगी ठरणाऱ्या ‘सिंधुगन’ची निर्मिती केली आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यद
Updated:

First published on: 09-12-2015 at 03:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7th std student create sindhu gun for farmers