मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना भाताण बोगद्यालगत एका स्विफ्ट डिझायर कारने गॅस टँकरला मागून धडक दिली. या धडकेत कारमधील चार जण जागीच ठार झाले. तर याच मोटारीतील एक प्रवासी महिला अत्यवस्थ आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
रसायनी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. कारने डाव्या बाजूकडून ओव्हरटेक करत असताना टँकरला मागून धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अपघातग्रस्त सातारा येथून लग्न समारंभ उरकून मुंबईला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत एकमेकांचे नातेवाईक असण्याची शक्यता आहे. पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 7:47 am