महाराष्ट्र विधानसभेची २०१९मध्ये झालेली निवडणूक कुणीही अजून विसरलेलं नसेल. खरंतर ही निवडणूक लक्षात राहिली ती शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे आणि निवडणुकीतनंतर घडलेल्या राजकीय भूकंपामुळे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात सभा घेतली आणि सातारवासीयांची माफी मागितली. त्यानंतर लागलेल्या निवडणूक निकालात या सभेचे परिणाम दिसून आला. पण, यात सगळ्यात महत्त्वाची आणि भाजपाने ताकद लावलेल्या मतदारसंघातील निवडणूक ठरली, ती बारामती विधानसभा मतदारसंघाची.

बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सगळ्यात जास्त रंगदार ठरली. त्याचं महत्त्वाचं कारण होतं, भाजपानं लावलेली ताकद. त्याला पार्श्वभूमी होती लोकसभा निवडणुकीची. शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. त्यावेळी भाजपानं कांचन कुल यांना उमेदवारी देऊन सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी ताकद लावली, पण त्यात भाजपा फारशी यशस्वी ठरली नाही. सुप्रिया सुळे यांनी ६ लाख ८६ हजार ७१४ मतं मिळवत विजय संपादन केला. त्यामुळे भाजपाचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

त्यानंतर विधानसभेच्या निवडणूका लागल्या. लोकसभेत झालेल्या पराभवाची सल भाजपाच्या मनात होतीच. त्यामुळे लोकसभेत झालेल्या पराभवाची परतफेड करायची असा चंग बांधल्याप्रमाणेच भाजपा बारामती विधासभा मतदारसंघात कामाला लागली होती. बारामती मतदार संघातून नेहमीप्रमाणे अजित पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यामुळे भाजपानं मतदारांचं समीकरण ओळखत वंचित बहुजन आघाडीतून आलेल्या गोपीचंद पडळकर यांना अजित पवारांविरोधात उभं केलं. ज्यादिवशी गोपीचंद पडळकर यांनी भाजपात प्रवेश केला, त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा वाघ बारामतीतून निवडून येणार असं जाहिरपणे बोलून दाखवत एकप्रकारे राष्ट्रवादीला आव्हानच दिलं. बारामती जिंकणारच असं भाजपाचे नेते बोलू लागले होते.

आणखी वाचा- वाढदिवस विशेष : अजितदादांचे हे डायलॉग्ज चांगलेच गाजले

भाजपानं दिलेल्या आव्हानामुळे आणि भाजपानं गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यानं खरंच चमत्कार होणार की काय? असं काही महाराष्ट्राच्या मनात सुरू होतं. लोकसभा निवडणुकीत भाजपानं २०१४ प्रमाणेच आपला दबदबा राखला होता. त्यामुळे बारामतीत काय होणार, अशी धाकधूक अखेरपर्यंत सुरू होती. त्याच आणखी एक कारण म्हणजे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत असणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रचार संपताना शेवटची सभा आपल्या मतदारसंघात घेतली होती. तर दुसरीकडे पडळकरांसाठी भाजपानं मोठी ताकद पणाला लावली होती.

निवडणूक निकालाच्या दिवसापर्यंत भाजपा बारामतीतील राष्ट्रवादीच्या गडावर विजय मिळवणार अशीच काहीशी स्थिती होती. खरी धाकधूक सुरू झाली ती मतमोजणीनंतर… बारामतीत कोण जिंकणार याकडे बारामती विधानसभा मतदारसंघातीलच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. त्यामागे महत्त्त्वाचं कारण होत अजित पवार! विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला लागले आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील चित्र हळूहळू स्पष्ट होत गेलं. बारामतीचा गड पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं जिंकला होता. अजित पवारांनी फक्त एक सभा घेऊन आपला दबदबा दाखवून दिला होता. पण, मोठी वाताहत झाली ती भाजपाची… कारण वाघ म्हणून जो उमेदवार अजित पवारांविरोधात उतरवला होता… त्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख ९५ हजार ६४१ मतं मिळवली. तर भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ३० हजार ३७६ इतकीचं मतं मिळाली होती. अजित पवारांनी फक्त एक सभा घेऊन बारामती विधानसभा मतदारसंघातील स्वतःच वर्चस्व सिद्ध करून दाखवलं होत…