News Flash

करोनाचे प्रमाण कमी करणारा ‘अमरावती पॅटर्न’ यशस्वी

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘अनलॉक’नंतरचा देशातील पहिला ‘लॉकडाऊन’ हा अखेर अमरावतीत लावण्यात आला.

(संग्रहित छायाचित्र)

मोहन अटाळकर

फेब्रुवारीच्या अखेरीस करोना संसर्गाच्या बाबतीत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अमरावतीत आता  स्थिती सामान्य होताना दिसत असताना ‘अमरावती पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच अमरावतीत दोन आठवड्यांची टाळेबंदी लागू करण्यात आली होती. अजूनही राज्यातील इतर शहरांप्रमाणेच अमरावतीत कडक निर्बंध लागू आहेतच. पण, करोनाची भयावह लाट ओसरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी अमरावतीत एप्रिलमध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आणि जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला वाढलेला मृत्युदर आणि  करोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे भीतीदायक वातावरण होते. सप्टेंबरपर्यंत संसर्गाने उच्चांक गाठला आणि एके दिवशी साडेचारशे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणादेखील हादरून गेली. सप्टेंबरच्या अखेरीस करोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून आली. त्यानंतर अचानकपणे आलेख खाली यायला लागला. करोनाबाधितांची संख्या दरदिवशी शंभर ते दोनशेपर्यंत मर्यादित होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही दिलासा मिळाला.

पण, त्याच वेळी टाळेबंदीतील शिथिलता, नागरिकांमध्ये करोना संसर्गाचे कमी झालेले भय, मुखपट्टी, सुरक्षित अंतराच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे करोनाचा संसर्ग हळूहळू आपले पाय पुन्हा पसरत असल्याचे वैद्यक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे होते, पण त्यावर फारशी चर्चा झाली नाही. दुसरीकडे, चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी दिसत असल्याचेही बोलले जाऊ लागले.

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तीन महिन्यांमध्ये स्थिती नियंत्रणात असल्याचे जाणवत असतानाच फेब्रुवारीमध्ये अचानकपणे संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांना मागे टाकत अमरावती जिल्हा हा कोविड-१९चा ‘हॉटस्पॉट’ बनला. दिवसागणिक करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. जिल्ह्याचा दैनंदिन करोना सकारात्मकतेचा दर हा त्या वेळी ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. म्हणजे १०० तपासण्यांपैकी ४८ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे चित्र त्या काही दिवसांमध्ये दिसले.

त्याआधी करोना संपला असे गृहीत धरून लोक मुखपट्टीविना फिरू लागले होते. लग्न समारंभ, इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत होती. तापमानातील बदलाचा परिणाम आणि अमरावतीत करोना विषाणू पसरण्याची क्षमता वाढल्याचे निरीक्षण त्या वेळी तज्ज्ञांनी नोंदविले होते.

अमरावती आणि अचलपूर या दोन शहरांमध्ये कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत असल्याचे दिसून येत होते. त्याच वेळी करोनाग्रस्त रुग्णांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण जास्त असल्याचेही आढळून आले.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘अनलॉक’नंतरचा देशातील पहिला ‘लॉकडाऊन’ हा अखेर अमरावतीत लावण्यात आला. या टाळेबंदीदरम्यान के वळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. सर्व बाजारपेठा, दुकाने बंद होती. सार्वजनिक वाहतूक, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, केशकर्तनालये, ग्रंथालये बंद ठेवण्यात आली. अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली. वर्षभर निर्बंध सहन करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा फार मोठा धक्का होता. व्यापाऱ्यांची नाराजी पत्करून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘टाळेबंदी’ लागू करण्याचा निर्णय घेतला. अनेक लोकप्रतिनिधींनही त्या वेळी नाराजी व्यक्त

केली. ही टाळेबंदी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली. एव्हाना, इतर जिजिल्ह्यांमध्ये देखील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत होते. संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात २२ ते २८ तारखेदरम्यान सरासरी ५५९३ अशी रुग्णसंख्या होती. तर महिनाभरानंतर २२ ते ३० मार्च दरम्यान रुग्णसंख्या ही २९८१ वर आली होती. रुग्णसंख्या तर कमी झालीच मृतांचे प्रमाणसुद्धा कमी झाले होते. अमरावतीत टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सगळया बाजारपेठा बंद होत्या, तर चाचण्या सुरुवातीप्रमाणेच सुरू होत्या. मुखपट्टी वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणची गर्दी काही प्रमाणात कमी झाली. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले.

सध्या अमरावतीत इतर जिजिल्ह्यांच्या तुलनेत करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. मध्यंतरीच्या काळात नागपूर आणि इतर काही जिजिल्ह्यांमध्ये करोनाबाधितांसाठी खाटांची संख्या अपुरी पडू लागल्याने रुग्णांना अमरावतीत हलविण्यात आले. अशा सुमारे सत्तरच्या वर रुग्णांवर अमरावतीत उपचार करण्यात आले, ही अमरावतीसाठी मोठी उपलब्धी ठरली. आता करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले, तरी अमरावतीकरांना खरोखरच दिलासा मिळाला आहे का, या प्रश्नाच्या उत्तरासाठी  आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

अमरावतीत फेब्रुवारीअखेर करोनाचा उद्रेक दिसून आल्यानंतर टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कडक निर्बंध आणि लोकांचा त्याला प्रतिसाद यामुळे अमरावती जिल्ह्यात आता स्थिती सामान्य होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील ‘अमरावती पॅटर्न’ची प्रशंसा केली आहे. अत्यंत प्रतिकू ल परिस्थितीत संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला होता. पण, लोकांच्या  सुरक्षिततेसाठी असे कटू निर्णय घ्यावे लागतात. तो निर्णय किती योग्य होता, हे आता अनेकांनी मान्य केले आहे.

– यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:03 am

Web Title: amravati pattern of reducing the amount of corona is successful abn 97
Next Stories
1 जायकवाडीच्या पाणी उपलब्धतेमुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न
2 Maharashtra Corona Update : २४ तासांत ५१९ रुग्णांचा मृत्यू; ६२,०९७ नवे करोनाबाधित!
3 “हात जोडतो, पण….”, राजेश टोपेंचं राज्यातील नागरिकांना कळकळीचं आवाहन
Just Now!
X