प्रदीप नणंदकर

देशभर टाळेबंदी सुरू झाली अन् स्वाभाविकपणे सर्व व्यवहार जसे बंद आहेत तसे ठिकठिकाणी आठवडी बाजार असलेले जनावरांचे बाजारही ठप्प झाले. यामुळे कोटय़वधी रुपयांची उलाढाल थांबली असून हजारो जणांचा रोजगारही गेला आहे. दरवर्षी कमी किमतीत जनावरे खरेदी करून ती तयार करून बाजारपेठेत विकणाऱ्यांचा वर्ग मोठा असून त्यातून त्यांची कमाईही चांगलीच असते. अशा लोकांचाही व्यवसाय या वर्षी बंद पडला आहे.

लातूर जिल्हय़ातील हाळीहंडरगुळी येथे भरणारा जनावरांचा बाजार हा देशातील प्रमुख बाजारांपैकी आहे. या बाजाराला शंभर वर्षांपेक्षाही अधिकचा इतिहास आहे. १७ एकरांवर दर शनिवारी हा बाजार सुरू होतो. रविवारी दिवसभर बाजार होतो व सोमवारी दुपारनंतर हा बाजार उठतो. या बाजारात बल, गाय, म्हैस, शेळय़ा, मेंढय़ा यांची मोठय़ा प्रमाणावर उलाढाल होते. आठवडाभर या बाजाराची परिसरातील लोकांना आशा लागलेली असते. मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व महाराष्ट्रातील विविध जिल्हय़ांतून या बाजारात जनावरे खरेदी करण्यासाठी व्यापारी येतात. ७० ते ८० हजार रुपयांची कमीत कमी बलजोडी असते व दीड लाखापेक्षादेखील अधिक किमतीचे बल या बाजारात मिळतात. ग्राहकाला जशा पद्धतीची जनावरे हवी आहेत त्या पद्धतीची जनावरे या बाजारपेठेत उपलब्ध असतात. काही शेतकरी दातही न काढलेले कोवळे पारडे खरेदी करतात. काही जण दोन दाती, काही जण चार दाती तर काही जण जुडलेले बल खरेदी करतात. बलांच्या बाजारात दलाल, हिरवा चारा विकणारे, जनावरांना पाणी पाजणारे, मेका, कासरे व दोरखंड विकणारे, खरेदी केलेली जनावरे संबंधितांच्या गावापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे वाहतूकदार अशी मोठी संख्या असते. हाळीहंडरगुळीच्या आठवडय़ाच्या बाजारातील उलाढाल ही पाच कोटींपेक्षा अधिकची असते.

अहमदपूर तालुक्यातील मावलगाव येथील शरद पाटील या प्रगतिशील शेतकऱ्याला यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, शेतकरी मेहनत करून पैसे कमावतात. तयार नसलेली जनावरे कमी किमतीत घेऊन त्यांचे पाच, सहा महिने भरणपोषण करून दुप्पट किमतीत जनावरे विकण्याचा व्यवसाय करणारे जिल्हय़ात हजारपेक्षा अधिक लोक असतील. या साऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. खरेदी केलेल्या जनावरांना पुढच्या दिवाळीपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी वाढली आहे.

*    लातूर जिल्हय़ातील देवणी येथील बाजार हाही मोठा आहे. बुधवार व गुरुवार असे दोन दिवस हा बाजार भरतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक प्रांतातील खरेदीदार या बाजारपेठेत येतात. देवणी वंशाच्या जनावरांना देशभर मागणी आहे. खासकरून गाय व बल त्यामुळे या बाजाराचे एक वेगळे वैशिष्टय़ आहे. जिल्हय़ातील रेणापूर, नळेगाव या दोन ठिकाणचा बाजारही मोठा असतो. नळेगावमधील बाजार पाच एकरांवर भरतो तर रेणापूरचा बाजार सात एकराच्या आवारात भरतो.

* उस्मानाबादचा बाजार, बीड जिल्हय़ातील नेकनूरचा बाजार, सोलापूर जिल्हय़ातील सांगोल्याचा बाजार, नगर जिल्हय़ातील श्रीगोंद्याचा बाजार व सांगली जिल्हय़ातील मिरजेचा बाजार हे जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. करोनामुळे सर्वच ठिकाणचा बाजार ठप्प झाला आहे.

*  साधारणपणे दिवाळी झाल्यानंतर बाजारात जनावरांची संख्या वाढू लागते व एप्रिल, मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात बाजार भरतो व त्यामुळे उलाढालही मोठी होते. महिना उलटून गेला पण बाजार बंद असल्याने या बाजारावर अवलंबून असणाऱ्या सर्वाचेच धाबे दणाणले आहे. जूननंतर बाजार बंद होतो.