18 September 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी, अण्णा हजारेंचे उपोषण अखेर मागे

अण्णा हजारे यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

लोकपालची अंमलबजावणी करा आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भातला कायदा त्वरित करा या दोन प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अनेक मागण्या अण्णा हजारेंनी केल्या होत्या. या मागण्यांसाठी त्यांनी मागच्या सात दिवसांपासून उपोषण सुरु केलं होतं. जे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आणि विनंतीनंतर मागे घेण्यात आलं आहे.  राळेगणसिद्धी या ठिकाणी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे आणि अण्णा हजारे यांची सुमारे सहा तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. ज्यानंतर लोकपालच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच लोकायुक्तासंदर्भात १३ फेब्रुवारीला बैठक बोलवण्यात येईल त्यामध्ये चर्चा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अण्णांनी केलेल्या मागण्या योग्यच आहेत आणि आम्हाला त्या मान्य आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच त्यानंतर त्यांनी अण्णा हजारेंना उपोषण सोडण्याची विनंती केली.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. लोकपालच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भातल्या कायद्याची नव्याने पुनर्रचना या दोन प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच इतर मागण्यांवरही सरकारने सहमती दर्शवली आहे ज्यामुळे मी समाधानी आहे आणि उपोषण मागे घेतो आहे अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

लोकायुक्ताच्या संदर्भात अण्णांचा आग्रह होता की लोकायुक्त कायदा नव्याने करावा, एक समिती स्थापन करण्यात यावी अशीही मागणी केली होती. बजेट अधिवेशनात आम्ही यासंदर्भातला ड्राफ्ट कायद्याच्या स्वरूपात मांडू ही मागणीही आम्ही मान्य केली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसंच समितीत अण्णा हजारेंनी सुचवलेले सदस्य आणि सरकारचे सदस्य असतील. कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भात अण्णा हजारेंनी स्वायत्ततेची मागणी केली होती या संदर्भातही जे नियम आम्ही तयार केले आहेत. अण्णा हजारे यांच्यातर्फे सोमपालजीही काम करतील.

अण्णांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही मान्यता दिली आहे. अल्प भूधारक शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीत वाढ करावी अशीही मागणी अण्णा हजारेंनी केली होती. या मागणीबाबतही आम्ही विचार करतो आहोत. शेतकऱ्यांच्या निधीत वाढ करण्याचा आमचा मानस आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 7:36 pm

Web Title: anna hazares fast over after cm devendra fadnavis meeting
Next Stories
1 ‘नाणार’विरोधात शिवसेना आक्रमक, समितीचं कामकाज बंद पाडलं
2 Maharashtra Budget 2019 : २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प
3 तेव्हा पूनम महाजन गांधारी झाल्या होत्या का?, शरद पवारांच्या नातवाचे टीकास्त्र
Just Now!
X