कीर्तन व प्रवचनातून विठ्ठलनामाचा गजर होतो. संत ज्ञानदेव ते तुकारामांपर्यंतच्या संतांची महती गायली जाते. पण आता त्याच व्यासपीठावर संवेदनक्षम मनाचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांच्या व पंढरपूर तीर्थक्षेत्राचे स्वच्छतादूत सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षांव सुरू आहे.
कीर्तन व प्रवचनातून दानशूर व राजकारण्यांचा उल्लेख कीर्तनकारांनी करणे अभिप्रेत असते. धार्मिक कार्याला मदत करणाऱ्यांचा ऋणनिर्देश करावा लागतो. पण ज्याची साधी ओळख नाही, ज्यांचा सिनेमा बघितलेला नाही. त्यांच्या कलेबद्दल थोडीफार ऐकीव माहिती आहे. असे असले तरी सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या अभिनेत्यांचे कीर्तनकार कौतुक करताना बघायला मिळत आहे. सामाजिक भावनेतून, समाजाचे उत्तरदायित्व निभावण्यासाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या संवेदनक्षम मनाच्या अभिनेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. त्याचे कीर्तनकारांना मोठे अप्रूप वाटत आहे. त्यामुळे कीर्तन-प्रवचनातून या अभिनेत्यांवर कौतुकाचा वर्षांव सुरू आहे. पहिल्यांदा चित्रपटसृष्टीतील अभिनेते कौतुकाचे धनी बनले आहेत.
नेवासे येथील तुकाराममहाराज संस्थानचे प्रमुख उद्धवमहाराज मंडलिक यांनी कान्हेगाव येथे कीर्तनात नाना व मकरंदचे अभिनंदन केले. उपस्थित वारकऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत टाळय़ा वाजवल्या. किशोरमहाराज शेळके, अर्जुनमहाराज चौधरी, बाबामहाराज मोरगे, कृष्णामहाराज, वसंतमहाराज खरात, जनार्दन खरात, अशोक खरात या वारकरी संप्रदायातील महंत कीर्तनकारांनी व भजन गायकांनी नाना व मकरंदच्या कार्याची प्रशंसा केली. पंढरपूरला यंदा विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अतिक्रमणे दूर करण्यात आली. चंद्रभागेच्या वाळवंटातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्थेचे नेटके नियोजन, सुलभ दर्शन व्यवस्था, कडेकोट सुरक्षा बंदोबस्त याचा सुखद अनुभव आषाढी वारीला गेलेल्या वारकऱ्यांना आला. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी त्याचे योग्य नियोजन केले. आता कीर्तनकार त्याचाही उल्लेख करत आहेत. उद्धवमहाराज मंडलिक यांनी मुंडे यांना सोलापुरात कायम ठेवा, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी वारकऱ्यांनी उभे राहावे, त्यांच्यावर आक्षेप घेऊन कुणी बदली करायची मागणी करत असेल तर त्याला विरोध करावा, असे आवाहन करून मुंडे यांना पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले.