बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईनं स्वेच्छा निवृत्ती घेत जदयूत प्रवेश करणाऱ्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा पत्ता कट केल्याचं समोर आलं आहे. जदयूनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पांडे यांच्या नावाचा समावेश नाही. दुसरीकडे पांडे इच्छुक असलेल्या मतदारसंघातून भाजपानं आपला उमेदवार जाहीर केला आहे. पांडे यांना उमेदवारांच्या यादीतून वगळल्यानंतर राष्ट्रवादीनं चिमटे काढत भाजपावर निशाणा साधला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जदयू व भाजपानं उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले व ऐन निवडणुकीच्या तोंडावर जदयूमध्ये दाखल झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांना दोन्ही पक्षांकडून डच्चू देण्यात आला आहे. बक्सर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास पांडे इच्छुक होते. मात्र, तिथे भाजपानं आपला उमेदवार जाहीर केला.

गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी यादीतून वगळण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपाला चिमटा काढला आहे. ‘एएनआय’शी बोलताना अनिल देशमुख म्हणाले,”गुप्तेश्वर पांडे (बिहारचे माजी पोलीस महासंचालक) यांना तिकीट देणं हा पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही असा प्रश्न विचारला होता की, भाजपाचे नेते त्यांचा प्रचार करतील का? कदाचित या प्रश्नाच्या भीतीमुळेच त्यांना तिकीट दिलं गेलं नसावं,” असा टोला देशमुख यांनी लगावला.

भाजपाला कोणता विचारला होता प्रश्न ?

गुप्तेश्वर पांडे यांच्याबद्दल गृहमंत्री देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला होता. “एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल. बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी केली. ते आता बिहारमधून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या प्रचाराला जाणार का?,” असा प्रश्न अनिल देशमुख यांनी विचारला होता.