आपण एकत्रितपणे काम करु, त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन, तुम्ही त्याचं नेतृत्व करा असं आश्वासन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांना दिलं आहे. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सकाळी भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी दोघांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली.

भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “छगन भुजबळ ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला इम्पेरिकल डेटा कसा गोळा करता येईल यासंबंधी माझं मत जाणून घेतलं. यावेळी मी त्यांना मराठा आऱक्षणावेळी कसा इम्पेरिकल डेटा गोळा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा वैध ठरवला याची माहिती दिली”. तसंच त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात आमच्याकडून पूर्ण मदत केला जाईल असं आश्वासनही दिल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

भुजबळ भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं ओबीसी आरक्षणाबद्दल मोठं विधान, म्हणाले…

“मला जे काही वाटतंय त्याबद्दल त्यासंदर्भात नोटदेखील करुन देण्यास तयार आहे. आपण एकत्रितपणे काम करु, त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन, तुम्ही त्याचं नेतृत्व करा. आमच्याकडून पूर्ण मदत होईल,” असं भुजबळांना सांगितलं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

“सुप्रीम कोर्टाने करोनामुळे निवडणुकीच्या संदर्भातील अधिकार निवडणूक आयोगाने दिले आहेत. सध्याच्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. पण फेब्रुवारीत महत्वाच्या निवडणुका होणार आहेत,” असं यावेळी फडणवीस म्हणाले.

अध्यक्षपदाच्या निवडणुका आवाजी मतदानाने करण्यावरुन टीका

“नियम बदलताना अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नियम समितीच्या संदर्भातील बैठक पार पडणं गरजेचं आहे. अन्यथा ती बैठक वैध ठरत नाही. पण त्याहीपलीकडे जर तुमच्याकडे बहुमत असताना का घाबरत आहात? याचा अर्थ तीन पक्षात सर्व काही आलबेल नसून एकमेकांवर, आमदारांवर विश्वास नाही म्हणून हात वरुन मतदान करण्याचा विषय आला आहे,” अशी टीका त्यांनी केली.

ज्यादिवशी सरकार कोसळेल तेव्हा…

“नाना पटोले एक बोलतात मग त्यावर शरद पवार मत व्यक्त करतात. मग काँग्रेसचे लोक नाना पटोलेंना न घेता शरद पवारांची भेट घेतात यावरुन काय चाललंय समजू शकतो,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असून हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल असा दावा यावेळी त्यांनी केला. ज्यादिवशी सरकार कोसळेल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ असंही ते म्हणाले आहेत.

काँग्रेसचं सायकल आंदोलन नौटंकी असल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली. राज्य सरकारच्या मनात असेल तर सरकार इंधन दरवाढीतून दिलासा देऊ शकतं असंही ते म्हणाले.