News Flash

“मला प्रियांका गांधींना विचारायचं आहे की त्यांनी…”, देवेंद्र फडणवीसांचा थेट गांधी कुटुंबावर निशाणा!

देशातील करोनाच्या परिस्थितीवरून प्रियांका गांधींनी सरकारवर टीका केली होती.

राज्यात करोनाची परिस्थिती चिंताजनक होऊ लागली असतानाच देशातील अनेक राज्यांमध्ये देखील करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे करोनाचे रुग्ण नियंत्रणात आणण्याचं आणि मृत्यू रोखण्याचं आव्हान केंद्र सरकारसमोर उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दुसरी लाट येणार असल्याचं माहिती असूनही सुविधा निर्माण का केल्या गेल्या नाहीत? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. त्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी अशा प्रकारे टीका करून, पत्रकार परिषदा घेऊन देशात वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

 

कधी महाराष्ट्रासोबत चर्चा केलीत का?

दरम्यान, याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट गांधी कुटुंबीयांवरच निशाणा साधला आहे. “असं दिसतंय की काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांना देशात नकारात्मकतेचं वातावरण निर्माण करायचं आहे. मला प्रियांका गांधींना विचारायचं आहे की त्यांनी या त्यांच्या मुद्द्यांवर कधी महाराष्ट्रातील सरकारसोबत चर्चा केली आहे का? इथे काय परिस्थिती आहे? देशातल्या एकूण करोनाबाधितांच्या मृत्यूंपैकी ३८ ते ४० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत. एकूण करोनाबाधितांपैकी ३५ ते ४० टक्के आणि एकूण अॅक्टिव्ह केसेसपैकी ३५ ते ३७ टक्के केसेस महाराष्ट्रात आहेत”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा”; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या

महाराष्ट्र दुसऱ्या लाटेसाठी तयार का नाही?

दुसऱ्या लाटेसाठी तयारी केली नसल्याची केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रियांका गांधी यांना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं उदाहरण दिलं आहे. “गेल्या वेळी महाराष्ट्राला करोनाचा सर्वाधिक फटका बसला होता. मग महाराष्ट्र या दुसऱ्या लाटेसाठी तयार का नाही राहू शकला? प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी सरकारला पत्र लिहून आणि पत्रकार परिषद घेऊन एक चित्र निर्माण करू पाहात आहेत. पण त्यांनी हेच सल्ले महाराष्ट्र सरकारला का नाही दिले?”, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

 

“भारतात सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती, पण तरी…”

प्रियांका गांधींनी देशातील करोनाच्या परिस्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे रिपोर्ट येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे. मग ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही. तुमच्याकडे आठ ते नऊ महिने होते. आज देशात फक्त २००० ट्रक ऑक्सिजनची वाहतूक होऊ शकते. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहोचण्याची गरज आहे. पण वेळेत पोहोचता येत नाही”, असं त्या म्हणाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 3:39 pm

Web Title: bjp devendra fadnavis lockdown in maharashtra priyanka gandhi on corona pmw 88
Next Stories
1 Nashik Oxygen Tank Leak: “निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?”
2 पंतप्रधान शेवटचा पर्याय म्हणाले, तरी महाराष्ट्राला लॉकडाउनची गरज -राजेश टोपे
3 “अजित पवारांच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे योग्य नाही”, चंद्रकांत पाटलांची टीका
Just Now!
X