News Flash

मनसेसोबत युती करणार का?; देवेंद्र फडणवीसांनी केलं सूचक विधान

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपा एकत्र येणार का याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे

भाजपा आणि मनसे एकत्र येणार या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

महाराष्ट्रामधील आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार हा प्रश्न वारंवार समोर येत असतो. शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीहून नागपूरला आले आहेत. नागपूर विमानतळावर येताच माध्यमांनी त्यांना घेराव घातला. यावेळी मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. या प्रश्नावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आल्यावर योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपा आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

मनसेने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारले असता, मनसेसोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंही त्यांनी म्हटलं.

राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात होणार भेट?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्यासोबत चंद्रकांत पाटील हे नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या युतीबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची पहिल्यांदाच ही भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

…तर मनसेसोबत युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, याआधी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत फडणवीस यांनी विचार जुळल्यास युतीसंदर्भात निर्णय घेता येईल. मात्र दोन्ही पक्षांची क्षेत्रीय अस्मितेसंदर्भातील मतं जुळली नाही तर मनसेसोबत युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. सध्या तरी भाजपा आणि मनसे या दोन पक्षांचे विचार जुळत नसल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं होतं.

“सध्या आमच्यासोबत युतीमध्ये असणाऱ्या लहान पक्षांना सोबत घेऊनच आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत, असं फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी नवीन एखादा कोणी येईल असं वाटतं का असा प्रश्न विचारला होता. यावर फडणवीस यांनी थेट उत्तर देताना तुमचा इशारा मनसेकडे असल्याचं मला कळतंय. तर मी स्पष्टपणे सांगतो की, मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलंय किंवा स्वीकारत आहेत, असं म्हटलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 11:20 am

Web Title: bjp leader devendra fadnavis about alliance with mns abn 97
Next Stories
1 “राष्ट्राला धोका ठरत असल्यानं काळी टोपीवाल्यांवर देशद्रोहाचे खटले ठोकण्याचा आदेश सरकारने काढावा”
2 महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
3 अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी सवलत योजना
Just Now!
X