News Flash

विरोधकांमधील दुही भाजपच्या पथ्यावर

सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचा प्रयोग अयशस्वी

सोलापूर महापालिकेच्या ३८व्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदी याच पक्षाचे राजेश काळे यांची निवड झाल्यानंतर पालिका सभागृहात सत्कार करण्यात आला होता.

सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचा प्रयोग अयशस्वी

एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

सोलापूर महापालिकेत भाजपच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीसह अन्य राजकीय पक्षांचा महाविकास आघाडीचा प्रयोग हाती घेण्यात आला खरा; परंतु तो अयशस्वी ठरला. महापालिकेत बहुमत नसताना गेल्या अडीच वर्षांपासून भाजपचा कारभार सुरू आहे. विरोधक विखुरले गेलेले आणि प्रत्येकाचे हितसंबंध कोठे ना कोठे आड येत असल्यामुळे भाजपला रोखणे अशक्य झाले आहे. महापालिकेतील भाजपचा निव्वळ ढिसाळ कारभार चाललेला असताना त्याविरोधात आवाज उठवून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची संधी वेळोवेळी येऊनसुद्धा ती घालवली गेली आहे. विरोधकांचा हा अनुभव पाहता महाविकास आघाडीचा प्रयोग हा केवळ देखावा होता, असे वाटू लागले आहे.

गेली अडीच वर्षे महापालिकेत सत्ता चालविताना भाजपमध्ये कधीही एकोपा न राहता सातत्याने अंतर्गत संघर्ष, भांडणे, शहप्रतिशहाचे राजकारण यांचेच दर्शन घडले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांची जबाबदारी अधिक सजग असणे अपेक्षित होती. परंतु त्यात एकच अपवाद वगळता त्यांना कधीही प्रभाव पाडता आला नाही.

गेल्या आठवडय़ात महापौर निवडीच्या वेळी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी जन्माला घालण्याचा प्रयोग यशस्वी होणे शक्यच नव्हते. यात प्रामुख्याने सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीचे राजकारण केंद्रबिंदू मानला जातो. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे महेश कोठे आणि एमआयएमचे तौफिक शेख या तिघांचेही एकमेकांच्या विरोधात राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राजकारणात कधी काहीही घडू शकते, असे म्हटले जाते. परंतु सोलापूर महापालिकेत विरोधकांना एकत्र यायचे झाल्यास त्यात सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीचे राजकारण आडवे येते. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे महेश कोठे यांनी सलग दोनवेळा आव्हान उभे केले होते. परंतु दोन्ही वेळा त्यांना अपयश आले. एमआयएमचे तौफिक शेख यांनीही यापूर्वी आमदार प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज दिली होती. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीतही एमआयएमचे फारूख शाब्दी यांनी प्रणिती शिंदे यांना झुंजविले होते. जय-पराजयाचे राजकारण हे निवडणुकीपुरते अपेक्षित असते. परंतु येथे एकमेकांच्या विरोधात अहंभाव दिसून येतो. परिणामी, महापालिकेत हे तिघेही भाजपचे विरोधक एकत्र येण्यास अडचणी आहेत.

पालिकेतील समीकरणे बदलली

महापालिकेत यापूर्वी वर्षांनुवर्षे काँग्रेसची सत्ता असताना कारभारी म्हणून दिवंगत नेते विष्णुपंत कोठे व त्यांचे पुत्र महेश कोठे हेच ओळखले जायचे. अलीकडे १० वर्षांत स्थानिक पातळीवर काँग्रेसमधील राजकारण बदलले आणि कोठे पिता-पुत्र काँग्रेसपासून म्हणजेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून दुरावले. नंतर महेश कोठे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करून मागील २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी आणली होती. परंतु त्यांना अपयश आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कोठे यांनी ऐनवेळी शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर संतप्त होऊन थेट बंडखोरी केली.  कोठे यांना सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला.

सत्ताधाऱ्यांना लाभ

* १०२ नगरसेवकांच्या महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ४९ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे २१, काँग्रेसचे १४, एमआयएमचे ९, राष्ट्रवादीचे ४, वंचित बहुजन आघाडीचे ३, बसपा व माकपचा प्रत्येकी एक याप्रमाणे नगरसेवकांचे पक्षीय संख्याबळ आहे. विरोधकांचे वैयक्तिक पातळीवर संख्याबळ आणि त्यांच्यातील हेवेदावे पाहता त्या सर्वाची मोट बांधली जाणे कठीण वाटते. त्याचाच लाभ सत्ताधारी म्हणून भाजपला होताना दिसून येतो.

* गेल्या अडीच वर्षांचा भाजपचा कारभार पाहता महापालिका म्हणजे त्यांच्यासाठी भांडणाचे ठिकाण झाले आहे. भाजपांतर्गत गटबाजीच्या आणि साठमारीच्या राजकारणात महापालिकेला राजकीय आखाडय़ाचे स्वरूप आले आहे. माजी मंत्री विजय देशमुख व सुभाष देशमुख या दोन गटात विभागलेल्या भाजपमध्ये महापालिकेत एखादे धोरण ठरविताना एकमताने निर्णय झाल्याचे चित्र अभावानेच दिसून आले. उलट, एकमेकांना खो घालण्याचेच राजकारण खेळले गेले. भाजपचा पाडाव करणे शक्य असतानाही विरोधकांच्या बेकीमुळे ते जमले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:29 am

Web Title: bjp mayor in solapur maha vikas aghadi experiment fail in solapur zws 70
Next Stories
1 अवजड लाद्या अंगावर पडल्याने दोन हमाल ठार
2 साथीचे आजार बळावले
3 बोईसरच्या पादचारी पुलाची रखडपट्टी
Just Now!
X