माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून, विधानसभेसोबत म्हणजेच २१ ऑक्टोबरलाच साताऱ्यात मतदान होणार आहे.

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाशी घरोबा केला. भाजपात जाण्यापूर्वी त्यांनी उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे साताऱ्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपात गेल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक होणार असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात होता. पण, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना साताऱ्याचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे साताऱ्याची विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्याच्या विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पोटनिवडणुकीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाचे आदेश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाले. त्यानंतर मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची आयोगाने घोषणा केली.