चंद्रपुरातील व्यक्ती नागपुरात मृत्यू पावला होता

चंद्रपूर : नागपुरात मृत पावलेल्या चंद्रपूरच्या संशयित रुग्णाचा २८ मार्चला आलेला मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेतील करोना चाचणी अहवाल सकारात्मक तर ३० मार्चला नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. दरम्यान, शासकीय चाचणी अधिकृत असल्याने तोच अहवाल सत्य असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत आहे. मग खासगी प्रयोगशाळेने प्रशासनाला माहिती न देता अहवाल सार्वजनिक केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळेवर कारवाईची सूचना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. दरम्यान, आज शुक्रवारी ताप, सर्दी,खोकल्याची लक्षणे दिसून आलेल्या तीन जणांना उपचारार्थ दाखल केले आहे.

या जिल्हय़ात विदेशातून आलेल्या २०४ नागरिकांची करोना चाचणी नकारात्मक आली. अन्य राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या २६ हजार २६ नागरिकांची नोंद केली आहे. यापैकी एकालाही करोनाची लक्षणे नाहीत. अशा स्थितीत इंडोनेशिया येथून चंद्रपुरात परतलेल्या रहमतनगर येथील व्यक्तीला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. निमोनियाचा उपचार सुरू असलेल्या या रुग्णाला नागपूरला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे त्याची प्रकृती आणखी खालावल्याने इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करताच अवघ्या दीड तासात त्याचा मृत्यू झाला. निमोनियाच्या या रुग्णाची दखल संशयित करोना रुग्ण म्हणून घेतली होती. दरम्यान, ३० मार्चला इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये त्यांची करोना चाचणी केली असता ती नकारात्मक आली. विशेष म्हणजे, खासगी हॉस्पिटलने २८ मार्चला त्यांचे नमुने मुंबईला प्रयोगशाळेत पाठवले असता करोना चाचणी सकारात्मक आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना विचारले असता, इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये करोना चाचणी केली असल्याने ती अधिकृत आहे. सदर रुग्णाचा अहवाल नकारात्मक होता. दरम्यान, खासगी प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक आहे तर जिल्हा प्रशासनाला कळवायला हवे होते, असेही ते म्हणाले. अशाही स्थितीत चंद्रपुरातील संबंधित खासगी डॉक्टर व मृताच्या कुटुंबातील सदस्यांना विलगीकरणात ठेवले आहे. त्या सहा जणांच्या करोना चाचणी अहवाल आज शुक्रवारी नकारात्मक आला असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

शहरातील एका हॉटेलच्या गच्चीवर ११ मुस्लीम समाजाच्या व्यक्तींना नमाज पडताना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, त्यानंतर त्यांना सूचना देऊन सोडून देण्यात आले.

करोना रुग्ण आढळला तर त्याला स्मशानभूमीत कशा पद्धतीने न्यायचे याचे प्रात्याक्षिक आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी प्रात्याक्षिक केले गेले.