विश्व विक्रमाचा विष्णू मनोहर यांचा दावा

२५७ किलो तांदूळ , १२५ किलो मूग डाळ , १५० किलो चना डाळ , ५० किलो तेल, १०० किलो तूप, ३५ किलो मीठ , १०० किलो गाजर, तीन हजार लिटर पाणी, मटर, दही ५० किलो, ४० किलो कोथिंबीर आदी साहित्य एकत्र करून पाच तासांत तीन हजार किलोची स्वादिष्ट खिचडी तयार करून प्रसिद्ध शेफ  विष्णू मनोहर यांनी रविवारी एका नव्या विक्रमाकडे वाटचाल केली आहे. चिटणीस पार्कवरील या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला हजारो खाद्य प्रेमीनी खिचडीचा आस्वाद घेत विष्णू मनोहर यांच्या नव्या उपक्रमाला भरभरुन दाद दिली.  विश्व खाद्य दिनाच्या निमित्ताने  खिचडीला ‘राष्ट्रीय अन्न’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी विष्णू मनोहर यांनी केली आहे.

भारतीय खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सलग ५३ तास स्वयंपाक करण्याचा विक्रम या अगोदर शेफ विष्णू मनोहर यांनी केला होता. घराघरात आणि गरिबांच्या ताटात असलेल्या खिचडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न विष्णू मनोहर यांनी केला.

चिटणीस पार्कमध्ये सकाळपासून विष्णू मनोहर यांचा विक्रम पाहण्यासाठी अन् खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी खाद्यप्रेमींनी गर्दी केली होती. विश्वविक्रम असल्यामुळे अनिल बोबडे, अरविंद पाटील, केशव वाबनकर या परीक्षकांच्या संमतीनंतर पहाटे ५.३० वाजता खिचडी तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला. ५१० किलो वजनाची, १० फूट व्यास व ३ फूट उंच असलेल्या कढईत तीन हजार किलोची खिचडी तयार करण्यास प्रारंभ केला.

साडेनऊ वाजता खिचडी तयार झाल्यानंतर लोकांनी एकच जल्लोष करत विष्णू मनोहर यांचे अभिनंदन केले. यावेळी हजारो लोकांनी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी घरून डब्बे आणले होते. काहींनी येथेच आस्वाद घेतला. मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, प्रा. विजय शाहाकार, प्रमोद पेंडके, निरंजन वासेकर, विजय जथे, मिलिंद देशकर, राजीव जैस्वाल, चंद्रकात पेंडके यांच्यासह मैत्री परिवार आणि साई सेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आबालवृद्धासह अनाथालय, अंध विद्यालयाचे मुले उपस्थित होते. या महाकाय स्वादिष्ट  खिचडीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.

ब्रँड विष्णू खिचडी

विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी खिचडीचा आस्वाद घेतला. यावेळी गडकरी म्हणाले, विष्णू मनोहर हे केवळ नागपूरचे भूषण नाही जगाचे भूषण आहे.भारतीय खाद्य संस्कृतीला त्यांनी जगात पोहोचवले आहे. गोरगरिबांची खिचडी जगात पोहोचली असून यापुढे विष्णू मनोहर यांनी विष्णू खिचडी म्हणून स्वतंत्र ब्रँड खाद्यविश्वात आणावा, असेही गडकरी म्हणाले.

आता अडीच हजार किलोचे वांग्याचे भरीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी ५३ तास स्वयंपाक करण्याचा विक्रम केल्यानंतर खिचडी राष्ट्रीय खाद्य म्हणून घोषित व्हावी, यासाठी हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे जळगावमध्ये २१ डिसेंबरला अडीच हजार किलोच्या वांग्याचे भरीत तयार करण्यात येणार आहे. मैत्री परिवारासह अनेक मित्राच्या सहकार्यामुळे हा विक्रम करू शकलो. खाद्यपदार्थ तयार करण्याचा एक वेगळा आनंद असतो. तो आनंद स्वत: घेत इतरांना देतो, असे विष्णू मनोहर या वेळी म्हणाले.