वाशी येथे राजकुमार कुंभार यांची कलाकृती

उस्मानाबाद : अठरा प्रजातींच्या नऊ हजार वृक्षरोपांतून शिवप्रतिमा साकारण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे वाशी येथे पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या प्रांगणात ही अनोखी शिवप्रतिमा राजकुमार कुंभार यांनी वृक्षरोपांतून साकारली आहे. बुधवापर्यंत ही प्रतिमा पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे.

वाशी येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव, नवनिर्माण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.

शिवरायांचे वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन विषयीचे प्रेम या शिवप्रतिमेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. राजकुमार कुंभार यांनी यापूर्वी रांगोळीच्या माध्यमातून भव्यदिव्य शिवप्रतिमा, पेन्सिलच्या टोकावर कोरलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती, तसेच खडूवर छत्रपती शिवरायांचे शिल्प साकारलेले आहे.

मुलांच्या माध्यमातून संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमाही त्यांनी केली होती. उस्मानाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकुमार कुंभार यांनी पाच हजार २०० पुस्तकांच्या माध्यमातून संत गोरोबा कुंभार यांची आकर्षक प्रतिमा साकारली होती. त्याची नोंद नुकतीच वल्र्ड्स इंडिया बुकमध्ये करण्यात आली आहे.