बेपत्ता व्यक्तीला चमत्काराद्वारे शोधून दाखवण्याचा दावा करणाऱ्या एका भोंदू बाबाविरोधात औरंगाबादमध्ये अघोरी प्रथा व जादूटोणा उच्चाटन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तत्पूर्वी पोलिसांना पाहताच हा बाबा हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हर्सुल पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कॅन्टिन चालक प्रशांत गणेश कांबळे (वय ३८) यांचे वडिल गणेश कांबळे हे गेल्या ५ वर्षांपासून घर सोडून गेले आहेत. राहत्या घरातून निघून गेलेल्या वडिलांना शोधण्यासाठी त्यांची आजही धडपड सुरु आहे. त्याच्या या आगतिकतेचा फायदा घेऊन एका भोंदू बाबाने त्यांना अघोरी चमत्काराच्या सहाय्याने तुझ्या वडिलांना शोधून आणतो असे सांगत पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी याला बळी न पडता संयम दाखवत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांना समोर पाहताच त्याची बोलती बंद झाली आणि त्याने तिथून धूम ठोकली. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मदतीने हे प्रकरण समोर आले आहे.

वडिल सुखरुप मिळतील या आशेपोटी प्रशांत कांबळे हर्सूलमधील जम्मनज्योती रोडवर असलेल्या एका दर्ग्यात प्रार्थनेसाठी गेले होते. या ठिकाणी नेहमीच गणी कादर पठाण (वय ६०, रा. पळशी) नामक हा भोंदू बाबा बसलेला असतो, त्याने प्रशांतला पाहताच त्यांची अडचण विचारली. त्यावर प्रशांत यांनी बेपत्ता वडिलांचा शोध घेत असल्याचे सांगताच भोंदू बाबाने त्यांना लिंबू कापून कागद पेटवून दाखवला व आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगत आपण तुझ्या वडिलांना शोधून आणू असे सांगत त्यांच्याकडे १,१०० रुपयांची मागणी केली.

दरम्यान, हा भोंदू बाबा त्या ठिकाणी असलेल्या अनेक महिला भाविकांनाही अशाच प्रकारे चमत्कार करुन दाखवत आपल्यात कथित दैवी शक्ती असल्याचे सांगत पैशांची मागणी करीत होता. प्रत्येकालाच हा बाबा अशा प्रकारे लुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशांत यांनी हर्सूल पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी येत असल्याचे दिसताच या भोंदू बाबाने धूम ठोकली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी अघोरी प्रथा व जादूटोणा उच्चाटन कायद्यांतर्गत या भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक मनीष कल्याणकर करीत आहेत.