करोना व्हायरसचा होणारा फैलाव लक्षात घेता, महाराष्ट्रात लॅबची संख्या प्रचंड कमी आहे. करोनाच्या चाचण्या करणाऱ्या लॅबची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात करोना व्हायरसच्या चाचण्या करणाऱ्या आठ नवीन लॅब होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी आज पुण्यातील एनआयव्ही या संस्थेला भेट दिली.

“उद्यापासून तीन ठिकाणी करोनाच्या चाचण्या करणाऱ्या लॅब सुरु होणार आहेत. नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरणे दिली जातील. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात करोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

धुळे आणि औरंगाबादमध्येही लवकरच करोनाच्या चाचण्या करणाऱ्या लॅब सुरु होणार आहेत. “पुण्यात नायडू रुग्णालयात १०० आणि वायसीएम रुग्णालयात ६० आयसोलेटेड बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच वर्क फ्रॉम होमची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल” असे टोपे म्हणाले.

“राज्यातील ४२ करोना बाधितांची प्रकृती स्थिर आहे. खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देण्यात येईल. पण त्यासाठी त्यांना आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. साहित्याची व्यवस्थाही त्यांनाच करावी लागेल असे राजेश टोपे म्हणाले. ज्यांची पैसे मोजण्याची तयारी आहे, ते जास्त पैसे भरुन हॉटेलमध्ये क्वॉरन्टाईनमध्ये राहू शकतात. फक्त तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. करोनाचा सामना करण्यासाठी ७०० व्हेंटिलेटर, ६०० आयसोलेशन बेडस तयार आहेत. खासगी रुग्णालयांना आयसोलेशन बेडस ठेवण बंधनकारक करण्यात आले आहे” असे राजेश टोपे म्हणाले. दुबईग्रुपमुळे महाराष्ट्रात ५० टक्के करोना व्हायरसचे रुग्ण वाढले असे राजेश टोपे म्हणाले.