रवींद्र जुनारकर

न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनुसार २० मे रोजी चंद्रपुरातील करोना प्रयोगशाळा सुरू होणे अपेक्षित होते. चंद्रपूरच्या दुर्देवाने येथील प्रयोगशाळेतील करोना चाचणी मशीन सिंगापूर येथून परस्पर जळगाव येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचा परिणाम चंद्रपूरकरांना आजही करोना चाचणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेवर विसंबून राहावे लागत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार २० मे रोजी चंद्रपूर, यवतमाळ तथा गडचिरोली या तीन जिल्ह्यात करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू होणे अपेक्षित होते. यातील गडचिरोली हा एकमेव जिल्हा सोडला तर चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांनी प्रस्ताव पाठविला होता. चंद्रपूरच्या करोना चाचणी प्रयोगशाळेचे काम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात युध्द पातळीवर सुरू झाले. तिथे एका कक्षात प्रयोगशाळा देखील उभारण्यात आली. आता प्रतीक्षा होती केवळ करोना चाचणी मशीनची.

ही आधुनिक मशीन सिंगापूर येथून येणार होती. मात्र, सिंगापूर येथून निघालेली चंद्रपूरची मशीन वैद्यक महाविद्यालयात पोहचण्याऐवजी रेड झोन असलेल्या जळगाव येथे पोहचली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी चंद्रपूरच्या शासकीय वैद्यक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना विचारणा केली असता, चंद्रपूरात रूग्णांची संख्या १९ म्हणजे जळगावच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही मशीन रेड झोनमध्ये असलेल्या आणि झपाट्याने रूग्ण वाढत असलेल्या जळगाव येथे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रपूरात येत्या आठवडाभरात पुन्हा नवीन मशीन येणार असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेसाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी २ कोटी १८ लाखाचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला होता. करोना चाचणी आधुनिक पध्दतीने झाली पाहिजे यासाठी सिंगापूर येथून मशीन मागविण्यात आली होती. मात्र, जळगावची गरज बघता तिथे ही मशीन पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चंद्रपुरातील रूग्णांची संख्या हळूहळू वाढ आहे. त्यामुळे चंद्रपूरात तात्काळ मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे.