सांगली : उद्यापासून आठ दिवसांची कठोर टाळेबंदी लागू केल्यामुळे मंगळवारी बाजारात प्रचंड गर्दी अनुभवण्यास मिळाली. किराणा मालाच्या दुकानापुढे ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरानंतर पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा वापर करून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

महापालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्य़ात आज मध्यरात्रीपासून संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असलेली किराणा दुकाने, बेकरी, भाजीपालाही बंद ठेवण्यात येणार असल्याने खरेदीसाठी आज झुंबड उडाली. सांगलीतील मारुती रोड, हरभट रोड, गणपती पेठ, मिरजेतील तांदूळ मार्केट, बुधवार पेठ, सराफ कट्टा आदी परिसरात मोठी गर्दी झाली होती. वाहनामुळे बराच काळ वाहतूक कोंडीही होत होती. मिरजेतील सराफ कट्टा रस्त्यावर एका दुकानासमोर झालेली गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य छडीमार करावा लागला. तर काही दुकानांना पोलिसांनी जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले.

जिल्ह्य़ात करोना बाधितांची संख्या वाढत असून सोमवारी एकाच दिवसात १ हजार ५६८ रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासनाने स्थिती गांभीर्याने घेत र्निबधामध्ये देण्यात आलेल्या सवलती मागे घेतल्या आहेत.

उद्यापासून किराणा व भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी विनाकारण घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मज्जाव असेल असे जाहीर करण्यात आले आहे.