बेरोजगारीमुक्त, कर्जमुक्त, प्रदुषणमुक्त, दुष्काळमुक्त, सुरक्षित आणि सुशिक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे. हे एकटय़ाचे काम नाही त्यासाठी तुमची साथ गरजेची आहे, असे भावनिक आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलिबाग येथील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात केले. राज्यात कर्जमुक्ती योग्य प्रकारे झालेली नाही, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणार नाही तोवर शिवसेना गप्प बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

जन आशीर्वाद यात्रा ही कोणाला आमदार बनवण्यासाठी काढलेली नाही. तर नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी काढलेली आहे. या निमित्ताने गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे. तेदेखील प्रश्न समजून ते सोडवण्याच्या दष्टीने प्रयत्न केले जात आहे. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. त्यासाठी आज मी तुमच्याकडे आलो आहे. राज्यातील इतर पक्ष हे निवडणुकीसाठी काम करतात. निवडणूक आली की त्यांचे नेते गावागावात मत मागायला जातात. पण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो कायम जनतेसाठी कार्यरत असतो. अडल्या नडल्याला मदत करतो. मदत करताना त्याचा जात धर्म अथवा पक्ष पाहत नाही.

जन आशीर्वाद यात्रे निमित्ताने राज्यातील विविध भागांचा दौरा केला. या वेळी फिरताना कर्जमुक्ती योग्य प्रकारे झाली नाही अशा अनेक तक्रारी समोर येत आहोत. आम्ही त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सरकट कर्जमुक्ती जोवर शेतकऱ्यांना मिळणार नाही तोवर शिवसेना गप्प बसणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

त्यामुळे राज्यात शिवशाही आणायची असेल तर एकत्र यायला हवे. लोकांना दिलेला शब्द शिवसेने कायम पाळला आहे. सत्तेत राहूनही संघर्ष केला आहे. जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी कायम ठेवली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरली. मुंबईकरांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. या मोर्चानंतर विमा कंपन्यांना जाग आली. १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मिळाले हा शिवसेनेचा दणका आहे. या वेळी शिवसेना उपनेत्या मिनाताई कांबळी, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शितल म्हात्रे, जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, विजय कवळे, राजा केणी, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

खड्डय़ांच्या प्रश्न लवकरच मार्गी लागणार

संपूर्ण महाराष्ट्रात खड्डय़ांचा प्रश्न आहे, विदर्भ मराठवाडय़ातील रस्तेही यातून सुटलेले नाही. मुंबईत मेट्रोची काम ठिकठिकाणी सुरू आहेत. काही ठिकाणी उड्डाण पूल बांधली जात आहेत. यामुळे मुंबईतील रस्तेही खराब झाले आहेत. सेलिब्रिटीच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनाही खड्डय़ांचा त्रास होतो आहे. याची सरकारला जाणीव आहे. लवकरच रस्त्याची कामे मार्गी लागतील. कोकणातील मुंबई- गोवा महामार्गाची परिस्थितीही बिकट आहे. खासदार विनायक राऊत यांनी याबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. याबाबतही लवकरच कारवाई होईल अस मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.