मनपा मिळकतनिहाय शोध मोहीम राबवणार

नगर : शहरात मोठय़ा संख्येने अनधिकृत नळजोड घेतले गेले आहेत. हे नळजोड नियमित करण्यासाठी महापालिकेने सवलत योजना जाहीर केली आहे. मागील बाकी न आकारता केवळ दंड आकारून अनधिकृत नळजोड नियमित केले जाणार आहेत. त्यासाठी तीन टप्पे लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर १ जानेवारी २०२२ पासून मनपा मिळकतनिहाय अनधिकृत नळजोड शोध मोहीम राबवणार आहे.

मनपाच्या दि. ३१ मार्च रोजी झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत अनधिकृत नळजोड शोध मोहीम राबवण्याचा निर्णय झाला होता. चार महिन्यांनंतर मनपा प्रशासनाने त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला. मागील बाकी न करता काही रक्कम भरून नळजोड नियमित केले जाणार आहे आहेत.

त्यानुसार जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी, चालू पाणीपट्टीचे १ हजार ५०० रु, अनामत रकमेची १ हजार ५००, नळजोडणी शुल्क ५०० रु., सेवा शुल्क २०० रु. व १ हजार रु. दंड असे एकूण ४ हजार ७०० रु. जमा केल्यास अनधिकृत नळजोड नियमित केले जाणार आहेत.

दि. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी दंडाची रक्कम १ हजार ५०० रु व एकूण ५ हजार २०९ रु. भरल्यास नळजोड नियमित केला जाईल तर दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत २ हजार रुपये दंड आकारून एकूण ५ हजार ७०० रुपये भरल्यास नळजोड नियमित केला जाणार आहे.

नळजोड नियमित करण्याची ही मुदत संपल्यानंतर १जानेवारी २०२२ पासून मनपा मिळकतनिहाय अनधिकृत नळजोड शोध मोहीम राबवणार आहे. ज्यांच्याकडे अनधिकृत नळजोड आढळतील, त्यांच्याकडून एकूण ६ हजार ७०० रुपये (३ हजार ७०० रु. शुल्क व ३ हजार रुपये दंड) वसूल करून गुन्हाही दाखल करणार आहे.

शहरातील अनधिकृत नळजोड नियमित करण्याची शोध मोहीम ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची व अनिवार्य आहे. प्रभाग अधिकारी व प्रभाग कार्यालयामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांना या संदर्भात काही शंका असल्यास त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय, प्रभाग अधिकारी व प्रभाग अभियंता यांच्याशी संपर्क साधावा.