सुहास बिऱ्हाडे

वसई-विरार महापालिकेला विविध विकासकामांसाठी जागाच नाही

वसई-विरार महापालिका विविध विकासकामांसाठी जागेच्या शोधात असताना शहरातील बहुतांश राखीव भूखंडावर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

नागरिकांच्या हिताचे आणि विकासकामांसाठी आरक्षित असलेले वसई-विरार शहरातील भूखंड आजही ओसाड पडलेलेल आहेत. यातील अनेक भूखंड अनधिकृत इमारतींनी गिळंकृत केलेले आहेत. शहरातील अनेक मोकळय़ा भूखंडावरही भूमाफियांची नजर आहे. अनेक आरक्षित भूखंड पालिकेकडे विकासकामांसाठी हस्तांतरित केले जाण्याचे आश्वासन देऊनही अद्याप ते हस्तांतरित झाले नसल्याने अनेक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. वनजमिनी, शासकीय जमिनी एकापाठोपाठ एक गिळंकृत करून त्यावर बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक जागा विविध विकासकामांसाठी शासनाने आरक्षित केल्या आहेत. त्या जागाही अनधिकृत बांधकाम करणा:यांनी हडप केल्या आहेत. त्यामुळे शहरातील आरक्षित जागा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वसई-विरारमधील भाजप पदाधिकारी राकेश सिंग यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार अनेक राखीव जागांवर अतिक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार वसई विभागामध्ये 50.69 टक्के, नालासोपारा विभागामध्ये 77.37 टक्के तर विरार विभागामध्ये 30.45 टक्के राखीव भूंखडावर अनधिकृत इमारती आणि अतिक्रमण झालेले आहे.

सर्वाधिक अतिक्रमणे प्रभाग ‘बी’मध्ये 90.67 टक्के असून सर्वात कमी 29.89 टक्के अतिक्रमणे प्रभाग समिती ‘सी’मध्ये झालेली आहेत. हे आरक्षित भूखंड शाळा, क्रीडांगण, उद्यान, पोलीस ठाणे, क्षेपणभूममी, बफर झोन आदी कामांसाठी आरक्षित करण्यात आले होते.

राखीव भूखंडाची माहिती देणारे फलक प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर धूळ खात पडले आहेत. राखीव भूखंडावर महापालिकेने लक्ष न दिल्याने भूमाफियांचे फावले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

20 ऑगस्ट 2011 साली राज्य सरकारने आरक्षित जागांसंदर्भात एक अध्यादेश जाहीर केला होता. त्या अध्यानुसार सार्वजनिक हितासाठी ज्या जागा आरक्षित असतील, त्या जागा विकास करण्यासाठी त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना हस्तांतरित करण्यात येतील, असे या अध्यादेशात म्हटले होते. मात्र त्या जागा महापालिकेला हस्तांतरित केल्या नसल्याने त्यावर अतिक्रमण झाले आहे.

महापालिकेने आधीच जर हे भूखंड ताब्यात घेतले असते तर आता अतिक्रमण झाले नसते. महापालिकेने या राखीव जागांच्या भूखंडावर झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, असे राकेश सिंग यांनी सांगितले.

ही अतिक्रमणे अनेक वर्षापासूनची असून त्यातील अनधिकृत इमारतीत रहिवासी राहत आहेत. शहरात ज्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, त्यावर आम्ही कारवाई करत असतो.

-सतीश लोखंडे, आयुक्त, महापालिका