नाशिकहून निघालेला किसान मोर्चा शनिवारी रात्री ठाण्यात पोहचलेला मोर्चा आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. विक्रोळी या ठिकाणी हा मोर्चा काही वेळात पोहचेल. त्यानंतर सायन या ठिकाणी असलेल्या सोमय्या मैदानावर हा मोर्चा थांबेल. तिथे जेवण आणि थोडी विश्रांती घेतली जाईल. त्यानंतर आज रात्रीच हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहचण्याची शक्यता आहे.

तर उद्या म्हणजेच सोमवारी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. विनाअट कर्जमाफीची प्रमुख मागणी आणि इतर अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा हा मोर्चा काढण्यात आला आहे. १० तारखेला हा मोर्चा भिवंडीत पोहचला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास हा मोर्चा ठाण्यातील कापूरबावडी, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी भागात पोहचला. हा मोर्चा ठाण्यात दाखल झाल्याने काही काळ तीन हात नाका, कापूरबावडी या भागांमध्ये वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.

अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा १२ मार्चला विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चाला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. किसानसभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले या सगळ्यांचा या मोर्चात सहभाग आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चेकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

१२ मार्चला २५ ते ३० हजार शेतकरी विधान भवनावर धडकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किसान सभेचा लाल बावटा हाती घेऊन आणि लाल टोपी घालून शेतकरी या मोर्चात सहभागी होत आहेत. त्यामुळे या मोर्चाला ‘लाल वादळ’च म्हटले जाते आहे. हे लाल वादळ उद्या विधान भवनावर धडकणार आहे. भिवंडीत मुक्कामी असताना या मोर्चातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देऊन, तसेच गाणी गाऊन आणि वाद्ये वाजवून सरकारचा निषेध केला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता हा मोर्चा सुरु आहे. आज हा मोर्चा मुंबईत दाखल होणार आहे.

काय आहेत मागण्या?

शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्याच्या नावावर कराव्यात

कोणत्याही अटी आणि शर्थी यांच्याशिवाय कर्जमाफी

शेती मालाला दीडपट हमीभाव

स्वामिनाथन आयोगातील रास्त शिफारसींची अंमलबजावणी

वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी

या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी १२ मार्चला किसान सभेचा हा भव्य मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चानंतर सरकार शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.