डहाणू कृषी अधिकाऱ्यांविरुद्ध कृषी सभापतींची तक्रार

लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : केंद्रीय अर्थसहाय्य लागवड योजनेअंतर्गत कृषी विभाग डहाणू यांनी सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांत मोगरा लागवडीसाठी अनुदान म्हणून डहाणू तालुक्यात १२९ शेतकऱ्यांना वितरित केलेल्या ५६ लाखांच्या निधीवाटपात गैरव्यवहार झाल्याबद्दल पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुशील चुरी यांनी कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. डहाणू कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या इतर योजनांच्या चौकशीचीही मागणी करणार असल्याचे लोकसत्ताशी बोलताना सांगितले. याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारले असता भ्रष्टाचार झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

डहाणू तालुक्यात कृषी विभागाकडून अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. चिकू, मोगरा लागवडीतून अनेक शेतकरी शेतीव्यवसायाकडे वळले आहेत. दरम्यान सन २०१५-१६ साली के ंद्रीय अर्थसहाय्य लागवड योजनेतून  मोगरा लागवडीसाठी डहाणू तालुक्यातील १२९ शेतकऱ्यांना ५८ लाखांचे निधी यावर्षी वितरित करण्यात आले. या योजनेतील लाभार्थाची यादी घेऊन दाभोण, ऐना या भागात कृषी सभापती सुशील चुरी यांनी शेतीची स्थळ पाहणी केली असता काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लागवड न करताच लाभ मिळाल्याचे निदर्शनात आले. तर काही लोकांना ८० ते ८५ हजारांचा हप्ता मिळाल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे या योजनेत गैरव्यवहार झाल्या प्रकरणी कृषी सभापती सुशील चुरी यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांविरुद्ध कृषी मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

मोगरा लागवड योजनेतील ऐना, दाभोण भागांतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटलो असता काही शेतकऱ्यांना लागवड न करता लाभ म्हणून पैसे देण्यात आले आहेत. त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

– सुशील चुरी, कृषी सभापती, पालघर जिल्हा परिषद

या योजनेत भ्रष्टाचार झालेला नाही. ही सन २०१३-२०१४ साली राबवलेली योजना आहे. डहाणू  तालुक्यात १२९ लाभार्थी आहेत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्याची चौकशी करून ही योजना दिली जाईल. योजनेतील गाइडलाइन प्रमाणे शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार वितरण करण्यात आले आहे.

– राजेश पवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू