रवींद्र जुनारकर, गडचिरोली

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या अंमलबजावणीत गडचिरोली हा आदिवासी जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या जिल्ह्य़ाने ३९.१२ लाख मनुष्य दिन रोजगार दिला आहे. याच क्रमात नागरी ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली आहे. नक्षलवादांच्या रक्तरंजित हिंसाचारात होरपळणाऱ्या या जिल्हय़ाने एकाच वेळी दोन पारितोषिक पटकावल्याने संपूर्ण देशाचे लक्ष गडचिरोलीकडे लागले आहे.

गडचिरोली जिल्हा म्हटले की, नक्षलवाद्यांचा हिंसाचार, हत्या, जाळपोळ, चकमकी, घनदाट जंगल हे चित्र सर्वप्रथम डोळय़ासमोर उभे राहते. मात्र गेल्या काही वर्षांत या जिल्हय़ाची ओळख बदलवण्यासाठी येथे येणारे तरुण अधिकारी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत आहेत. या प्रयत्नातूनच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या कामात गेल्या दोन वर्षांत या जिल्हय़ाने देशपातळीवर मोठे यश संपादन केले आहे. आकडेवारीत सांगायचे झाले तर या गडचिरोलीत शेततळे, सिंचन विहिरी, वर्मी कंपोस्ट आदी ६ हजार ७०० कामे मनरेगाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहेत. रोजगार हमीचे आयुक्त तसेच गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग, उपायुक्त के.एन.राव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत बहरे, गटविकास अधिकारी एस.पी. पडघम यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करताना मनरेगाच्या कामाचा व्याप प्रत्येक गावात नेला. २०१६-१७ या आर्थिक वर्षांत एकूण ८ हजार ८९४ कामांना येथे प्रत्यक्ष सुरुवात झाली. यातून दोन वर्षांत विक्रमी ३९.१२ लाख मनुष्य दिन रोजगार निर्मिती करण्यात आली. यात केवळ साधी कामेच घेण्यात आली नाही तर विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वात या आदिवासीबहुल जिल्हय़ामध्ये मनरेगांतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला. विशेष म्हणजे, २०१७-१८ या वर्षांत या जिल्हय़ातील ४५७ ग्रामपंचायतींपैकी ४५३ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामाची अंमलबजावणी करण्यात आली. देशाचा आणि राज्याचा विचार केला तर इतक्या मोठय़ा संख्येत इतरत्र कोणत्याही ग्रामपंचायतींनी इतकी कामे केल्याचे दिसून येत नाही. औद्योगिकदृष्टय़ा अतिशय मागास असलेला हा जिल्हा रोजगारामध्ये राज्यात शेवटच्या स्थानी आहे. आजच्या घडीला या जिल्हय़ात एकही मोठा उद्योग नाही. शेती आणि जंगलावर येथील आदिवासींचे आयुष्य अवलंबून आहे. एकदा का धान पीकझाले की मग वर्षभर आदिवासींना रोजगार नसतो. परिणामी, अनेक तरुण नक्षल चळवळीतही सहभागी झाले. अशा कठीण प्रसंगी रोजगार हमी योजना या तरुणांसाठी धावून आले आहे. या योजनेमुळे आदिवासी तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होण्याऐवजी रोजगार हमीच्या कामावर जायला लागला.

नागरी ग्रामपंचायतीचाही सन्मान

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्हय़ातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीने एनआरएमची विक्रमी ३८ कामे पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून गावात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. या ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कामे पूर्ण केलेली आहेत. विशेष म्हणजे, या कामाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी आणि गावातीलच तरुणांनी या कामाच्या माध्यमातून पैसे कमवावे, अशा पद्धतीचे नियोजन सरपंच व ग्रामसेवकाने मिळून केले. या नियोजनाची दखल घेऊन सरपंच म्हशाखेत्री व ग्रामसेवक शिवणकर यांचा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हाधिकारी शेखर सिंह, तत्कालीन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांचाही सत्कार करण्यात आला. जलयुक्त शिवार तसेच शेततळय़ांचीही अनेक कामे या जिल्हय़ात करण्यात आली आहेत.

नागरी ग्रामपंचायतीसोबतच जिल्हय़ातील ४५७ पैकी ४५३  ग्रामपंचायतींनी अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. मनरेगाचे काम प्रत्येक रिकाम्या हाताला मिळावे, याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष दिल्यानेच या जिल्हय़ात या योजनेला यश मिळाले आहे.

दूरदृष्टी अन् कल्पकतेचा परिणाम

गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गरीब आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने मनरेगाकडे विशेष लक्ष देऊन बहुसंख्य कामे करवून घेतली. त्यामुळे आदिवासी मजुरांना पैसे मिळाले. परिणामी, ते नक्षलवादी चळवळीपासून दूर राहिले व मोठय़ा प्रमाणात जिल्हय़ात कामेसुद्धा झाली.