डोक्यावरून पाणी वाहून नेण्याच्या त्रासातून सुटका

ऐनशेत-पेठरांजणी या ग्रुप ग्रामपंचायतीतील पेठरांजणी या गावातील महिलांना दूरवरून डोक्यावर हंडे ठेवून पाणी भरावे लागत होते. यात  या महिलांना मोठय़ा प्रमाणात शारीरिक कष्ट करावे लागत होते. ही अडचण रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड यांनी लक्षात घेऊन त्यांनी ऐनशेत पेठरांजणी येथील पाणी टंचाईग्रस्त कुटुंबीयांना ‘पाणी वाहन’ (वॉटरव्हील) या संकल्पनेतील जारचे वाटप केले. त्यामुळे या महिलांच्या डोक्यावरील भार कमी झाला आहे.

उन्हाळ्यात येथील महिलांना दूरच्या अंतरावरून डोक्यावर पाण्याचे हंडे आणि कळशा आणाव्या लागत होत्या. महिलांना हे पाणी आणण्यास सुकर व्हावे, यासाठी  ५० गरजू आदिवासी महिलांना वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइडचे अध्यक्ष वैभव ठाकरे, उपाध्यक्ष हकीम बेतासीवाला, प्रकल्प अध्यक्ष आणि रोटरीचे सर्व सदस्य, सरपंच शालिनी गोवारी उपस्थित होते.