वसई-विरार शहरांत करोना रुग्णवाढीचा आलेख उतरणीला लागला आहे. रुग्णांची दैनंदिन आकडेवारी शंभरच्या खाली आल्याचे चित्र आहे.

सप्टेंबरअखेरीस दिवसाकाठी रुग्णांची सरासरी १५० ते २०० च्या आसपास होती. मात्र महिन्याभरानंतर शहरातील रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. सध्या दिवसाला ८० ते ९० च्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत.

शहर आणि ग्रामीण भाग मिळून २१ ते २९ सप्टेंबर या कालावधीत सुमारे १,५४७ रुग्णसंख्या होती. तर २१ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत रुग्णसंख्या ८८० पर्यंत खाली आली आहे. ही घट ६६७ इतकी आहे. आजवर वसईत शहर आणि ग्रामीण भागांत एकूण २७ हजार ८०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी शहरी व ग्रामीण मिळून एकूण २६ हजार ८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच ९३.८३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.वसईच्या शहरी व ग्रामीण भागात मध्यंतरी मृत्यूच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत होती. आता मात्र त्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. वसईत आतापर्यंत एकूण ७१७ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही २.५७ टक्के इतकी आहे. यात गंभीर आजाराचे रुग्ण व ५० वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे.

दरम्यान मीरा-भाईंदरमध्ये ३६०  प्राणवायूची सुविधा असेल्या ३६० अतिरीक्त खाटांची व्यवस्था होणार आहे. खाटा  कमी पडू लागल्यास पुन्हा बंद करण्यात आलेली केंद्र सुरू केली जातील, अशी माहिती मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी दिली.

मीरा-भाईंदरमध्येही ६० टक्क्य़ांनी घट

मीरा-भाईंदरमधील करोना रुग्णवाढीच्या संख्येत संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून काही उपचार  आणि अलगीकरण केंद्रे बंद करण्यास सुरुवात केली आहे. आजवर ९१.९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण दुपट्टीचा वेग ५२ दिवसांवर गेला आहे. महिनाभरापासून करोनाचा प्रसार आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रुग्णवाढीच्या संख्येत ६० टक्क्य़ांनी घट झाली आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण आता ९१.९७ टक्के झाले आहे. पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत सध्या १०९५ रुग्ण उपचाराधीन आहेत.मागील  काही दिवसांत पालिकेच्या  डेल्टा गार्डन जवळील उपचार केंद्रात आणि गोल्डन नेस्ट येथील अलगीकरण कक्षात रुग्ण नसल्याने ते मोकळे करण्यात आले आहे.