सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बार्शी येथील एका ७५ वर्षाच्या वृध्दाचा करोनाबाधा होऊन मृत्यू झाला. या मृतासह ग्रामीण भागात आज २७ नव्या बाधित रूग्णांची भर पडली. विशेषतः अक्कलकोट व बार्शीमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे.

बार्शी शहरातील कसबा पेठेत राहणाऱ्या एका ७५ वर्षाच्या वृध्दाला करोनाबाधा झाल्याने सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. याच कसबा पेठेसह बार्शीत पाच करोनाबाधित रूग्ण सापडले. यात एका महिलेचा समावेश आहे. तर अक्कलकोटमध्ये बाधित ११ नवे रूग्ण आढळून आले. यात अक्कलकोट शहरातील पाच तर तालुक्यातील सहा रूग्ण समाविष्ट आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील महामारीचा प्रादुर्भाव वाढतच असून आज बोरामणीत तीन पुरूष व एका महिलेला करोनाचा संसर्ग झाला. तर होटगी स्टेशन येथेही एक रूग्ण सापडला. मोहोळ व माढा तालुक्यातही प्रत्येकी एका रूग्णाची भर पडली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत रूग्णसंख्या २९३ झाली असून मृतांचा आकडा १५ झाला आहे. इकडे सोलापूर शहरात काल रात्री बाधितांची संख्या केवळ चारवर थांबली होती. मात्र तरीही मृत्युचे सत्र सुरूच राहिले. काल एकाच दिवसात सहा बाधितांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण रूग्णसंख्या २ हजार ०८४ तर मृतांची संख्या २४८ वर पोहोचली होती.

जिल्ह्यात सर्वाधिक १२७ बाधित रूग्ण दक्षिण सोलापुरात तर अक्कलकोटमध्ये ६१ रूग्ण आहेत. बार्शीत ४४ आणि त्याखालोखाल उत्तर सोलापुरात २२ रूग्णसंख्या झाली आहे.