येत्या निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युती होणार हे निश्चीत झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघंही पहिल्यांदाच एका कार्यक्रमात एकत्र आले होते. बुधवारी(दि.20) मुंबईत एका माध्यम समूहाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनाही राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष बापट आदी राजकीय हस्ती उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांच्या नजरा उद्धव ठाकरे काय बोलणार याच्याकडे होते. यावेळी आभार मानताना उद्धव म्हणाले, ‘दोन दिवस झाले जरा तोंड बंद आहे. कारण परवापासून (म्हणजे युतीची घोषणा झाल्यापासून) काय बोलावं हेच सूचत नाही’, असं उद्धव म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर उद्धव यांनी मी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनाच हाऊज द जोश असं विचारु इच्छितो असं म्हटलं, यावर मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्याकडे पाहत स्मित हास्य केलं.

त्यानंतर उद्धव यांनी, ‘आमच्या युतीबद्दल ज्यांना जे बोलायचं असेल त्यांना बोलुद्या, मैदानात आल्यानंतर बघू काय करायचं ते’ असं म्हणत विरोधकांना इशारा दिला. तसंच आता राजकारणावर भाष्य करणार नाही असं म्हटलं. यानंतर बोलताना उद्धव यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली आणि पाकड्यांच्या पेकाट्यात अशी लाथ बसली पाहिजे की पुन्हा उभं राहण्याची हिंमत व्हायला नको, असं म्हटलं. याशिवाय सोहळ्याच्या सुरूवातीला उद्धव ठाकरे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना शेजारी बसायला खुर्ची देत ‘युती’ दाखवून दिली.