सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉईजना पोलिसांचा त्रास होणार नाही. त्यांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

देशमुख म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो की, आपले कर्तव्य बजावणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉईजना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानांच्या वेळांमध्येही कोणतेही बंधन घालण्यात आलेली नाहीत. ठराविक वेळेतच ही दुकानं बंद राहतील ही केवळ अफवा आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी.”

पुणे पोलीस देणार ओळखपत्रं

पुण्यात खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरू करण्यात येणार आहे. खाद्यपदार्थ घरपोहोच देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची पोलिसांसोबत गुरुवारी बैठक पार पडली. यामध्ये पुणे पोलीसांकडून डिलिव्हरी बॉईजना ओळखपत्रं देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे दिली.

दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास खुली ठेवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी करोनाविषयीच्या उपयाययोजनांच्या संदर्भात एक बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.