सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं करतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काहीही कारवाई करताना दिसत नाहीत मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तातडीने राम कदमांचा राजीनामा घेतला असता. हातातून सत्ता गेली तरीही बेहत्तर पण महिलांचा सन्मान अत्यंत महत्त्वाचा आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे ताशेरे झाडले. कोपरगाव येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. आघाडीच्या काळात महिलांचा सन्मान राखला गेला. स्व. आर. आर. पाटील यांच्या निर्णयामुळे महिला पोलीस महाराष्ट्रात दिसत आहेत. मुलींना समान अधिकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच पुढाकार घेतला आहे असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

दही हंडीच्या कार्यक्रमात भाजपा आमदार राम कदम यांनी मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्याचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले होते. मी तुमची कोणतीही समस्या सोडवायला तयार आहे असे सांगताना तुम्ही जर मला सांगितले की मी मुलीला प्रपोज केला आहे ती नाही म्हणते. मग मी काय करणार? तुमच्या आई वडिलांना बोलवणार ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तुमच्यासाठी तिला पळवून आणणार. त्यासाठी लिहून घ्या हा मोबाइल नंबर असे सांगत राम कदम यांनी आपला मोबाइल क्रमांक दिला होता. 9833151912 हा मोबाइल क्रमांक त्यांनी जाहीरपणे सांगितला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी राम कदमांवर टीका केलीच होती. आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर राम कदम यांचा राजीनामा घेतला असता असे म्हणत पुन्हा एकदा टीका केली आहे.