News Flash

नवनवीन संशोधने आत्मसात करून शिक्षण प्रणाली राबवावी – शरद पवार

दिवंगत गुलाबराव पाटील यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांनी सहकार चळवळीला नवा विचार आणि नवी शक्ती दिली.

शरद पवार

सांगली : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये दर्जेदार शिक्षणातून नवी पिढी घडविण्याचे काम होत असून या पुढील काळात या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने आत्मसात करून नवी शिक्षण प्रणाली राबवावी, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी गुरुवारी येथे बोलताना केले.

गुलाबराव पाटील संकुल मिरज येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री मल्लीकार्जुन खग्रे होते. समारंभास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा व पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृह  राज्यमंत्री शंभुराज देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, खा. श्रीनिवास पाटील, यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, मोहनराव कदम, सुमनताई पाटील, विक्रम काळे, ऋतुराज पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी उपस्थित होते. प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

दिवंगत गुलाबराव पाटील यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांनी सहकार चळवळीला नवा विचार आणि नवी शक्ती दिली, असे गौरवोदगार काढून खासदार शरद पवार म्हणाले,की गुलाबराव पाटील यांनी सहकार संघाच्या माध्यमातून कर्तृत्ववान व्यक्तींचे जाळे निर्माण केले. या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून कित्येक डॉक्टर तयार करून रूग्णसेवेचे महान कार्य यशस्वीपणे चालविले आहे.

या वेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी खग्रे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराची जोपासना करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सनातनींचे विचार कसे दिसतात हा प्रश्न पडतो. गौरी लंकेश, दाभोळकर, पानसरे यांच्यासारख्या विवेकवादींच्या हत्या होत असताना तरुणांना त्याचे काहीच कसे वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. शिक्षणाबरोबरच आचार विचार आणि संस्कार या गोष्टींना प्राधान्य देऊन चांगल्या विचारधारेतून सामाजिक समानता आणि समता जोपासली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, खा. श्रीनिवास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी गुलाबराव पाटील पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरणही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्व. डॉ. पतंगराव कदम खुले सभागृहाचे आणि स्व. संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल नामकरण सोहळा पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला.

वसंतदादा गटावर टीका

विधानसभा निवडणुकीमध्ये काही मंडळींनी हातचे राखून काम केल्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा अल्प मतांनी पराभव झाला, असे सांगत खा. शरद पवार यांनी अप्रत्यक्ष वसंतदादा गटावर टीका केली. मी नसेन तर अन्य कोणी नाही अशा भूमिकेमुळे नुकसान होते. जर एकदिलाने निवडणूक लढविली गेली असती तर यापेक्षा वेगळे चित्र पाहण्यास मिळाले असते असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 1:48 am

Web Title: implement the education system by embracing new research ncp chairman sharad pawar akp 94
Next Stories
1 ‘‘त्या’ कृत्यात एकूण १६ जणांचा सहभाग’
2 पुलवामातील हौतात्म्याचा सरकारला विसर!
3 परदेशी जातीच्या द्राक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी
Just Now!
X