जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज (९ जुलै) वाखरीतील एमआयटी येथील कोविड केअर सेंटर येथून आठ जणांनी करोनावर मात केली असून, टाळ्यांच्या गजरात व मोठ्या उत्साहात त्यांना घरी सोडण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कोविड सेंटर येथे उपचारासाठी आतापर्यत ३२ करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एमआयटी कोविड केअर सेंटर येथून आठ रुग्ण यापूर्वी घरी सोडण्यात आले होते. त्यातील २५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यातील आठ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यत १६ जणांना घरी सोडण्यात आले असून, कोविड केअर सेंटर येथे करोनाबाधित १७ रुग्णांवर योग्य उपचार सुरु असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
परराज्यातून आणि परजिल्ह्यातील रेडझोनमधून आलेल्या नागरिकांमुळे तालुक्यात संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन विभागाने तालुक्यातील परस्थिती समन्वायाने हाताळून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पध्दतीने केले. त्यामुळे येथील स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली असल्याचे ढोले यांनी सांगितले. नागरिकांनी स्वच्छता, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपयांची अंमलबजावणी करुन, आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे, आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
पंढरपूर तालुक्यात गजानन महाराज मठ, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि वाखरी कोविड केअर सेंटर येथे स्वॅब घेण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच रॅपिट अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले यांनी सांगितले. तालुक्यात आत्तापर्यंत ९०० जणांची करोना चाचणीची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १६६ तपासणी अहवाल प्रलबिंत आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे, आवाहनही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले यांनी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 1:44 pm