जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

पालघर: करोना संसर्ग झालेल्या तसेच संशयित असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या सुविधांचा स्तर उंचाविण्यात येणार आहे तसेच त्या ठिकाणी निवास करणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या गैरसोय येत्या आठवडाभरात कमी करण्यात येतील अशी ग्वाही,  पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्य़ात अशा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात रुग्णांसाठी जागेची सुविधा उपलब्ध असल्याची त्यांनी माहिती दिली.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘केंद्रांना उपचाराची गरज’ या वृत्ताची दखल घेऊन त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. जिल्ह्य़ात संशयित रुग्णांच्या निवासासाठी अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याची क्षमता २२७० खाटांचे आहे. सद्य:स्थितीत अशा ठिकाणी सुमारे २५ टक्के रुग्ण दाखल झाले आहेत.  त्याचप्रमाणे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या  रुग्णांकरिता जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात ४३६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्यापैकी सध्या फक्त ६२ रुग्ण दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना करोना रुग्णांना इतर आजार आहेत अशा संवेदनशील रुग्णांसाठी ४५५ खाटांची व्यवस्था कोविड समर्पित रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आली असून अशा ठिकाणी सध्या १८६ रुग्णांना  दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

देखरेखीसाठी समन्वय अधिकारी

काही उपचार केंद्रावर स्वच्छता, जेवणाचा दर्जा, पिण्याचे पाणी, गरम पाणी, विद्युत उपकरणांमधील दोष व इतर गैरसोयी असल्याचे मान्य करत त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी शासकीय विभागातील अभियांत्रिकांची ‘समन्वय अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत स्वछता, शुद्ध पाणी व इतर सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले असून त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी पांडुरंग मगदूम यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.  केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दाखल रुग्णांना गैरसोयींवर उपाययोजना करणे, रुग्णांचा अभिलेख ठेवणे व अशा केंद्रांचे कालांतराने पाहणी करणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  केंद्रांमधील गैरसोय कमी न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.