News Flash

आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना हे मोदींच्‍या वर्षपूर्तीचं वैशिष्‍टय – मुनगंटीवार

पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे करोनाचा प्रसार रोखणे शक्य

आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना हे मोदींच्‍या वर्षपूर्तीचं वैशिष्‍टय – मुनगंटीवार
संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. करोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने करोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला. भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र, एकसारखीच लोकसंख्या असूनही १ जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे. या १४ देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झाले. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळेच करोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले.

“करोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतक-यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले” असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतिमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू करणे तसेच पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील पीडीत धार्मिक अल्पंसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले. गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती, असे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी मोदींच्या कार्यकाळाचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 7:04 pm

Web Title: innovative measures for a self reliant india are the hallmark of pm modi year end says sudhir mungantiwar aau 85
Next Stories
1 सरपंच, सदस्यांना मुदतवाढ देणे घटनाविरोधी : हसन मुश्रीफ
2 यवतमाळमध्ये आणखी तिघेजण करोना पॉझिटिव्ह
3 महाराष्ट्रात ग्रीन झोनमध्येही सध्या सुरू होणार नाहीत शाळा; पण अभ्यासक्रम होणार सुरू
Just Now!
X