पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत जिल्ह्य़ात १५ हजार खाती उघडण्यात आली. या नव्या योजनेमुळे ‘सबका साथ सबका विकास’ हे घोषवाक्य तंतोतंत अंमलबजावणीत येईल, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
योजनेच्या उद्घाटनप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. जी. अंभोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्य़ात ही योजना कार्यान्वीत करताना ४१६ केंद्रांमध्ये बँकांचे एजंट नेमले जाणार आहेत. जिल्ह्य़ात सुमारे ५ लाख ५० हजार कुटुंबे आहेत. जिल्ह्य़ातील बँक खात्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, एकाच व्यक्तीची अनेक खाती असल्यामुळे प्रत्येक घरातील व्यक्तीने खाते उघडले आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे गरिबातील गरीब व्यक्तीचे बँकेत खाते असेल, अशी माहिती लवांडे यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेतील रक्कम वाटपासाठी बँकांच्या एजंटांची मदत घेऊन चांगला उपक्रम सुरू केला असल्याचेही लवांडे यांनी सांगितले. योजनेचा सर्वसामान्य व्यक्तीस लाभ होईल, असे खैरे यांनी सांगितले. कार्यक्रमात १०० खातेधारकांनी खाते उघडले. त्यांना पासबुक देण्यात आले. सूत्रसंचालन अनंत घाटे यांनी केले.
जन-धन योजनेस परभणीमध्ये प्रारंभ
वार्ताहर, परभणी
पंतप्रधान जन-धन योजनेचा प्रारंभ महाराष्ट्र ग्रामीण बँक मुख्य शाखेतर्फे येथील माळीगल्लीत करण्यात आला. जिल्हा बँकेच्या वतीनेही नागरिकांचे खाते उघडून पासबुक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे विभागीय अध्यक्ष यशवंत कवडे, तर व्यासपीठावर नगरसेविका सुदामती थोरात, शाखा व्यवस्थापक प्रमोद अंबेकर, वित्तीय साक्षरता केंद्राचे संयोजक गणेश गोिवदलवार, अॅड. रमाकांत गायकवाड, ज्योती शाहपुरकर, कांताबाई दुधारे आदी उपस्थित होते. शुभारंभप्रसंगी १११ ग्राहकांनी या योजनेत खाते उघडले. प्रत्येक प्रभागासाठी बँका वाटून दिल्या आहेत. त्याप्रमाणे ग्राहकांनी त्या त्या भागातील बँकेत खाते उघडावे. ही योजना तळागाळातील कुटुंबांना आर्थिक उन्नतीसाठी जाहीर केल्याची माहिती कवडे यांनी दिली. बँक अधिकारी साहेबराव राऊत यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हा बँकेतर्फे विकासनगर येथील नागरिकांचे बँकेत खाते उघडून जन-धन योजनेचा प्रारंभ करण्यात आला. नगरसेवक उदय देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी एस. एस. गरुडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. जाधव, व्यवस्थापक आर. व्ही. मौजकर, व्ही. आर. कुरूंदकर, एस. आर. कदम उपस्थित होते.