‘मियावाकी फॉरेस्ट संकल्पने’अंतर्गत २६ प्रजातीच्या रोपांची लागवड

कासा  :  पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातील टाळेबंदीच्या कालावधीत विलगीकरण केंद्रावर सेवा बजावत असताना एकीकडे संस्थेच्या आवारात जपानी पद्धतीने ‘मियावाकी फॉरेस्ट संकल्पना’अंतर्गत विविध प्रकारची वृक्षलागवड केली आहे.

संस्थेच्या १०० वर्ग मीटर जागेत डॉक्टर अकिरा मियावकी या जपानी वनस्पती शास्त्रज्ञांच्या पाच खंडांमध्ये यशस्वी ठरलेल्या जंगल लागवडीच्या पद्धतीने सुमारे ३१२ रोपांची लागवड केली आहे. यामध्ये २६ प्रजातींच्या रोपांचा समावेश असून, अशा नैसर्गिक पद्धतीने  छोटे जंगलच आवारात निर्माण करतात.

या लागवडीमुळे झाडे दहापट वेगाने वाढतात, तीसपट घनदाट असतात आणि ३० पट अधिक कार्बन डाय-ऑक्साइड शोषतात. दोन वर्षांनंतर या झाडांना कोणत्याही प्रकारच्या देखभालीची आवश्यकता नसते.

तसेच या पद्धतीच्या लागवडीमुळे मातीचा पोत वाढतो, जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते, तसेच किडे, कीटक, पक्षी यांच्याकरता एक परिसंस्था निर्माण होते. यात लागवडीच्या भागातील मूळ प्रजातींची लागवड केल्याने पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. ‘मियावाकी फॉरेस्ट संकल्पना’ राबवीत असताना कोणत्याही कृत्रिम खताची वा कीटकनाशकाची याला आवश्यकता नसते, असे संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी माहिती दिली. सदर लागवड करण्याकरता शिल्पनिर्देशक गुलाब पिंगळे, संदीप पाटील या स्थानिक उद्योजकांचे या कामी सहकार्य लाभले आहे.