सोलापूरसह आसपासच्या सहा जिल्ह्यातील अवर्षणप्रवणग्रस्त ३४ तालुक्यांसाठी वरदान ठरणारा कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लागणे ही काळाची गरज आहे. रस्ते विकासासाठी १५-१५ हजार कोटींचा निधी उपलब्ध होतो, तर त्याचवेळी कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी आíथक अडचण दाखविणे योग्य नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्यावतीने अभियंता दिनानिमित्त आयोजित आदर्श अभियंता पुरस्कार वितरण समारंभात खासदार मोहिते-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मृतिमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास आमदार सिध्दाराम म्हेत्रे, आमदार दीपक साळुंखे-पाटील, आमदार हणमंत डोळस, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे आदी उपस्थित होते. जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती शहाजीराजे ऊर्फ बाबाराजे देशमुख यांनी स्वागत केले.
या वेळी आर.एस. कलमनी (अक्कलकोट), बी.बी. एकतपुरे(माळशिरस), पी. डी. डोके (दक्षिण सोलापूर), बी. एस. गुंड (मंगळवेढा), एस. एम. सय्यद (बार्शी), सौ.जे. एन. कुलकर्णी (सोलापूर मुख्यालय) व व्ही. व्ही. देवकर (कुर्डूवाडी) या अभियंत्यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरील भार वरचेवर वाढत चालला असताना नजीकच्या काळात या धरणातून आणखी ५० टीएमसी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पाणी कमी अशी स्थिती उद्भवणार असल्यामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा एकच उपाय असल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी नमूद केले. हा प्रकल्प मोहिते-पाटील यांचा नाही. त्यासाठी कोणीही प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील शेती व ग्रामीण अर्थकारण उजनी धरण आणि उसाच्या शेतीवर अवलंबून आहे. या जिल्ह्यात दोन कोटी मे. टन उसाचे उत्पादन होते आणि ३२ साखर कारखान्यांद्वारे तब्बल पावणे दोन कोटी टन उसाचे गाळप होते. उजनी धरणात पाणीच नसेल तर आगामी ऊस गळीत हंगामात ४० लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक राहून जळूनही जाईल, अशी भीतीही खासदार मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली. या वेळी राजन पाटील यांनी खासदार मोहिते-पाटील यांच्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासंदर्भात भूमिकेला पािठबा दिला. आमदार दीपक साळुंखे, आमदार हणमंत डोळस, जि. प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे आदींची भाषणे झाली. श्व्ोता हुल्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.