प्रशांत देशमुख/वर्धा

१५० किमीचे अंतर पायीच चालण्याचा निर्धार करत काल रात्रीच निघालेल्या बालाघाटी मजुरांची समजूत घालून त्यांना धर्मशाळेत थांबवण्यात सामाजिक कार्यकर्त्यांना यश आलं आहे.   शनिवारी रात्री ही घडामोड झाली. बांधकामासाठी येथे आलेल्या साठ बालाघाटी मजूर कुटुंबांपैकी वीस कुटुंबांनी रात्रीच परतीच्या प्रवासाला जायचा निर्णय घेतला आणि प्रवास सुरुही केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानामागून ते पुढे गेले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बजाज यांच्या निदर्शनास ही बाब आली. स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवून असणारे सचिन अग्निहोत्री यांना कळविण्यात आले.

यानंत या सगळ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही मंडळी ऐकेनात. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांना घटनास्थळी बोलवल्यानंतर मजूर मंडळी थांबली. त्यांना रात्रीच बजाज व अग्निहोत्री यांनी बच्छराज धर्मशाळेत हलवले. जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली. मात्र तरीही या मजुरांचा गावी परतण्याचा हेका कायम असल्याचे चित्र आहे.  तर दुसरीकडे जिल्हा व राज्याच्या सीमा बंद असूनही गावी पायीच परत जायला निघालेल्या समृध्दी महामार्गाच्या चारशेवर मजुरांनाही प्रशासन व स्वयंसेवी संघटनांनी शनिवारी संध्याकाळी थांबवून धरले.

महामार्गाच्या कामासाठी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार येथील मजूर आले होते. मात्र काम ठप्प झाल्याने व वेतन नसल्याने पायीच निघालेल्या या मजुरांची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी घटनास्थळी म्हणजेच सेलू तालुक्यात धाव घेतली. याचवेळी अग्निहोत्री संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे यांनाही बोलविण्यात आले. या दोघांच्या चमूने तेल आणि डाळीसह आवश्यक ते शिधावाटप केले. गावच्या सरपंचांनी पाण्याची व्यवस्था केली. याचवेळी समृध्दीच्या व्यवस्थापकांना चार दिवसांचे वेतन देण्याचे निर्देश देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्या सूचनेनंतर आरोग्यखात्याने मजुरांची वैद्यकीय तपासणी केली. आज प्रत्येक शिबिरात तांदूळ वाटप करण्यात आले. तर सावंगी परिसरातील सहा कष्टकरी परिवारांना माजी सैनिक प्रवीण पेठे धान्य व किराण्याचे वाटप करीत त्यांची भूक भागविली.