शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यभर परिचित वर्धा जिल्ह्य़ातील बहुतांश पक्षाचे उमेदवार मात्र करोडपती शेतकरी असल्याचे अफलातून चित्र पुढे आले आहे.
वर्धा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांनी शेतीचा व्यवसाय नमूद केला आहे. शेतातच घर व गोठा असलेल्या त्यांनी स्वत: खरेदी केलेली शेती करंजी (भोगे) येथे आहे. औद्योगिक वसाहतीत तीन मालकीचे व दोन भाडय़ाचे भूखंड, वर्धा व नागपुरात फ्लॅट, पती-पत्नी मिळून २५० ग्रॅम सोने, घरगुती उपकरणे, कार अशी विविध स्वरूपाची मालमत्ता आहे. पत्नी पूजा, मुलगी प्रणवी व मुलगा रौनक अशी सर्वाची मिळून दोन कोटीची मालमत्ता आहे, तर १५ लाखाचे कर्ज आहे. बारावी उत्तीर्ण शेखर शेंडेंवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे असून शेतीसोबतच एका पेट्रोलपंपाची मालकी आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रा. सुरेश देशमुख यांनीही शेती व्यवसाय नमूद केला आहे. जिल्हा बँकेत मुदत ठेव, सूतगिरणीचे शेअर्स, ७०० ग्रॅम सोने, पाच किलो चांदी, एक ट्रॅक्टर, करंजी (भोगे) येथे २३ एकर शेती, वैशालीनगरचे घर व नागपुरात सिव्हिल लाईन परिसरात फ्लॅट, अशी स्वत:ची ६२ लाखाची व पत्नी स्वाती देशमुख यांची मिळून ९० लाखाची मालमत्ता दर्शविली आहे. राज्यशास्त्राचे पदव्युत्तर असलेल्या प्रा. देशमुख यांच्यावर लोकसेवकांवर हल्ले, संपत्तीला इजा पोहोचविणे, सरकारी कामात अडथळा, अशा स्वरूपाचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.
भाजपचे उमेदवार डॉ. पंकज राजेश भोयर पीएच.डी. असून प्राचार्य आहेत. विविध १३ बँकांची खाती असणाऱ्या डॉ. भोयर यांच्याकडे विविध कंपन्यांचे बॉण्ड्स, मुदत ठेवी, ४७० ग्रॅम सोने, २ किलो चांदी, केळापूर, आलोडी, वरोरा, वरूड, जरूड, म्हसाळा येथे ३५ एकर शेतजमीन, वर्धा, यवतमाळ, कामठी, अमरावती, वरूड व सावंगीत भूखंड व चंद्रपूर, हिंगणघाट, काटोल, वरोरा, चंद्रपूर व नागपुरात फ्लॅट, इमारती व दुकाने, अशी पत्नी शीतल व मुलगी आकांक्षाच्या नावे एकूण साडेपाच कोटी रुपयांची मालमत्ता आहे. कोणतेही कर्ज नाही व एकही खटला प्रलंबित नाही.     
शिवसेनेचे रविकांत पांडूरंग बालपांडे बांधकाम साहित्य पुरवठादार असून त्यांचे विविध ठिकाणी भूखंड, राहते घर, रेनॉल्ड डस्टर कार, सोने, अशा स्वरूपात पत्नी कवितासह १ कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. वाणिज्य पदवीचे अध्र्यावर शिक्षण सोडणाऱ्या बालपांडे यांच्यावर एकही खटला नाही. भाजपच्या बंडखोर उमेदवार व जि.प.अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचे पती राणा रणनवरे यांच्याकडे पती-पत्नी मिळून ४५० ग्रॅम सोने, महागडी अरिया, टाटा सुमो, स्कार्पिओ व ट्रॅक्टर ही वाहने, २३ एकर शेती, शेतघर, हिंगणी व पिंपळा येथे भूखंड, अशी मिळून ३ कोटीची मालमत्ता आहे. अकरावी उत्तीर्ण रणनवरे यांच्यावर कोणताही खटला प्रलंबित नसून ९ लाखाचे वाहनकर्ज आहे. राज्यमंत्री व देवळी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क येथील वॉगन्र महाविद्यालयात व्यवस्थापनशास्त्रातील पदवी घेतली असून व्यवसायाने ते शेतकरी, तर पत्नी पौर्णिमा वकिली करतात. देवळी तालुक्यातील रोहणीला २७ एकर शेती, मुंबईला अंधेरीत फ्लॅट, वध्र्यात घर, महिंद्रा कार व ट्रॅक्टर, बँकेत ठेवी, वडिलोपार्जित संपत्ती तसेच पत्नीच्या व मुलगी आर्याच्या नावे दागिन्यांसह मालमत्ता आहे. कुटुंबाची एकूण संपत्ती ५ कोटीवर आहे.
याच मतदारसंघातीलभाजपचे उमेदवार सुरेश वाघमारेही शेतकरी आहेत. त्यांची स्वकष्टार्जित पाच एकर व पत्नी वनिता यांची पाच एकर शेतजमीन हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूरला आहे. पती-पत्नी मिळून अर्धा किलो सोने, मारुती कार, बँकेच्या मुदत ठेवी, पत्नीच्या नावे पेट्रोलपंप, वध्र्यात घर, अशी १ कोटी २ लाखाची मालमत्ता आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर असणाऱ्या वाघमारेंवर वर्धा, सेलू, चांदूर व हिंगणघाटच्या न्यायालयात विविध खटले प्रलंबित आहेत.
याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे शशांक घोडमारे शेतकरी असून वायफ डच्या यशवंत विद्यालयात वरिष्ठ लिपिक आहेत. बंॅकेत रोख, मुदत ठेवी, सूतगिरणीत भागभांडवल, ट्रॅक्टर, बुलेट, स्वत: व अवलंबून असणाऱ्या चार व्यक्तींसह मिळून १ किलो सोने, अकृषक जमीन, भूखंड, निवासी इमारत, अशी कुटुंबाची एकूण मालमत्ता दीड कोटीची मालमत्ता आहे.
हिंगणघाट मतदारसंघातील विद्यमान आमदार व शिवसेनेचे उमेदवार अशोक शिंदे शेतकरी व पत्नी गृहिणी आहे. आयटीआय शिक्षण झालेल्या शिंदेंची शिवणखेड व वरखेडला मिळून पती-पत्नीच्या नावे ४५ एकर शेतजमीन आहे. तसेच महिंद्रा बोलेरो, टाटा सफोरी, ट्रॅक्टर, मिनिट्रॅक्टर व चार दुचाकी, अशी वाहने आहेत. बँक, पतसंस्था, मुंबईचे पॅनकार्ड क्लब येथे मुदत ठेवी, हिंगणघाटला घर, अशी १ कोटी १० लाखाची मालमत्ता आहे. वर्धा नागरी व जिल्हा बँॅकेकडे एकूण पावणे आठ लाखाचे कर्ज आहे. शिंदे यांच्यावर दंगा करणे, सरकारी कामात अडथळा, गैरकायदेशीर जमाव, शांतता भंग करणे, या स्वरूपातील खटले प्रलंबित आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार राजू तिमांडे पदवीधर व नोकरीत असून शेतीही करतात. विविध बँकेत ठेवी, बोपापूर व पोहणा येथे वारसाहक्काने प्राप्त शेतजमीन, मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट, सोने, अशी ८० लाखाची मालमत्ता आहे. विविध न्यायालयात आठ खटले प्रलंबित आहेत.
काँग्रेसच्या  उषाकिरण थुटे यांची सेवानिवृत्त म्हणून नोंद असून वारसाहक्काने व स्वकष्टार्जित १५ एकर शेतजमीन आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात भूखंड, हिंगणघाटला घर, नागपुरात फ्लॅट, अशी ३ कोटी ३५ लाखाची मालमत्ता आहे.
भाजपचे समीर कुणावार शेतकरीच आहेत. बारावी झालेले कुणावार यांच्या विविध बँकेत मुदत ठेवी, पाजेरोसह दोन कार, पती-पत्नी मिळून ११० तोळे सोने, नागपूर जिल्ह्य़ात हिंगणा येथे ४ कोटी रुपये किमतीची ५१ एकर शेतजमीन, कान्होलीबारा येथे लेआउट, हिंगणघाटला दुकान, हिवरा व हिंगणघाटला घरे, नागपूरला फ्लॅट, एक रिव्हॉल्वर, पत्नी श्रद्धाच्या नावे पेट्रोलपंप, अशी एकूण ८ कोटीची मालमत्ता आहे.