21 September 2019

News Flash

लातूरकरांसाठी एकाच दिवशी रेल्वेने ५० लाख लिटर पाणी

रविवारी एकाच दिवशी दोन रेल्वे पाण्याच्या पोहोचल्या अन् सर्व पाणी टाकीपर्यंत नेता आले.

महाराष्ट्रदिनी मिरजेहून लातूरला ५० वॅगनच्या दोन रेल्वे एकाच दिवशी पोहोचून तब्बल ५० लाख लिटर पाणी लातूरकरांना मिळाले. १२ एप्रिलपासून लातूरला रेल्वेने पाणी मिळते आहे. आर्वी जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीची क्षमता ३५ लाख लिटरची आहे. अतिरिक्त पाणी आले तर ते केवळ टँकरने देणे सोयीचे नाही, या साठी दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले आर्वी जलशुद्धीकरण केंद्र, भांबरी ते बार्शी रस्त्यावरील पाण्याची टाकी अशी जलवाहिनी दुरुस्त करण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांना यश आले व हे पाणी आता बंद वाहिनीद्वारे नेता येऊ लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच ही चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे रविवारी एकाच दिवशी दोन रेल्वे पाण्याच्या पोहोचल्या अन् सर्व पाणी टाकीपर्यंत नेता आले.

शहरातील विवेकानंद चौक, गांधी चौक व सरस्वती कॉलनी या तीन टाक्यांवर टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या तिन्ही टाक्यांवर पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचते आहे. निम्नतेरणा प्रकल्पातील बेलकुंड येथून दररोज २५ लाख लिटर पाणी उचलले जात आहे. बेलकुंडहून औसा एमआयडीसी व तेथून लातूपर्यंत बंद वाहिनीद्वारे २० लाख लिटर पाणी उचलले जाणार आहे. रविवारी हे पाणी बेलकुंडहून औशापर्यंत पोहोचले. दोन दिवसात लातूर एमआयडीसीपर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात यश आले तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यानुसार बेलकुंड येथून टँकरने २५ लाख लिटर व बंद वाहिनीद्वारे २० लाख लिटर असे ४५ लाख लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते. सरकारने परतूरहून दररोज १ रेल्वे पाणी देण्याचा निर्णय घेतला, तर नव्याने २५ लाख लिटर पाणी उपलब्ध होईल. शहराची गरज टंचाई काळात अडीच कोटी लिटर आहे. किमान १ कोटी लिटरच्या आसपास पाणी उपलब्ध झाले तर लातूरकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. महापालिकेने एकूण ११० टँकर शहरात वितरणासाठी उपलब्ध केले आहेत. आगामी काळात यातही वाढ करण्याची गरज आहे. पालिकेच्या वतीने पाण्याचे दैनंदिन वेळापत्रक जाहीर केले जात आहे. अजून प्रत्येक प्रभागात ध्वनिक्षेपकाद्वारे पाणी कोणत्या गल्लीत येणार ही यंत्रणा कार्यरत झाली नाही. मात्र, पूर्वीपेक्षा वितरण यंत्रणेत काही प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत.

First Published on May 3, 2016 1:35 am

Web Title: latur get fifty lakh liters water by railway
टॅग Latur,Railway