News Flash

करोनामुळे पारनेर तालुका पाच दिवस बंद

भाळवणी येथील आठवडे बाजारातही अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली.

पारनेर येथील भाजीबाजारात तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सकाळी सात वाजता कारवाई केली.

पारनेर : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात करोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने व गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण तालुका पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जाहीर केले. रुग्णालये, औषध दुकाने, रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका वगळता इतर सर्व व्यवसाय सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण बंद राहतील. अनावश्यक कारणांसाठी रस्त्यावर  फिरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.

सुपे, भाळवणी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योग बंद राहणार नाहीत. मात्र उद्योगांच्या व्यवस्थापनाने कामगारांच्या राहण्याची व्यवस्था कंपनीच्या आवारात करावी. ते शक्य नसल्यास १० टक्के कामगारांच्या उपस्थितीत उद्योग सुरू ठेवता येतील. मात्र या कामगारांची नावे महसूल प्रशासनाला कळवणे बंधनकारक असल्याचे श्रीमती देवरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत टाळेबंदीची अंमलबजावणी अधिक कडक करण्याच्या सूचना ग्रामीण प्रशासनाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आज (बुधवार) सकाळी सात वाजता तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बळप रस्त्यावर उतरले. खालच्या वेशीजवळील चौकात परवानगी नसतानाही भरलेला भाजी बाजार बंद करण्यात आला. या वेळी तहसीलदारांशी हुज्जत घालणाऱ्या भाजी विक्रेत्यांना पोलिसी हिसका दाखवत ताब्यात घेण्यात आले. भाजी,फळे विक्रेत्यांना द्वार विक्री करण्याची परवानगी दिलेली असताना अनेकदा सांगूनही भाजी, फळे विक्रेते ऐकत नसल्याने आज कडक कारवाई करण्यात आली. भाळवणी येथील आठवडे बाजारातही अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली.

जिल्हा बँकेला २५ हजारांचा दंड

टाकळी ढोकेश्वर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दोनशेपेक्षा जास्त ग्राहक आढळल्याने तहसीलदार देवरे यांनी बँकेला २५ हजार रुपये दंड ठोठावला. तर टाकळी ढोकेश्वर येथील किराणा दुकानात कापड विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने या दुकानदाराला १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. किराणा दुकानात कापड विक्री होत असल्याची खात्री करण्यासाठी श्रीमती देवरे बनावट ग्राहक बनून दुकानात गेल्या. कापड विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यावर दंड ठोठावण्याबरोबरच करोना संसर्ग संपेपर्यंत संबंधित किराणा दुकान सील करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

करोना संसर्गाचा उद्रेक

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आज (बुधवार) तालुक्यात आज ३०० करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील नगर शहरासह इतर तालुक्यांच्या तुलनेत पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या तिसऱ्या क्रमांकाची आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या नगर शहरात ५८३ तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहाता तालुक्यात ३०४ रुग्ण आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 1:58 am

Web Title: lockdown in parner taluka for five days due to corona zws 70
Next Stories
1 जिल्ह्यात लशींचा खडखडाट
2 उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा करोनाने मृत्यू
3 लातूर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
Just Now!
X